लाखनी, दि. १९ :जिल्ह्यात आणि तालुक्यातील युवकांनी शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यादृष्टीने रोजगार मेळावा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तातडीने घेण्यात यावे. जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये व औद्योगिक क्षेत्रांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यात यावे तसेच सुशिक्षित बेरोजगारांना आणि व्यावसायिक पात्रताधारकांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा
अशा विविध मागण्यांचे निवेदन भारतीय युवा बेरोजगार संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री यांना तहसीलदार लाखनी यांच्यामार्फत देण्यात आले.
गेली अनेक दिवस संगणक परिचालक त्यांच्या अडचणींसाठी संघर्ष करत आहेत तेव्हा संगणक परिचालकांना देखील योग्य मानधन देण्यात यावे ही देखील प्रमुख मागणी या माध्यमातून शासनाला करण्यात आलेली आहे. निवेदन देताना शिष्टमंडळात भारतीय युवा बेरोजगार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बालूभाऊ चुन्ने, प्रवक्ता राकेश राऊत, लाखांदूर तालुका अध्यक्ष हितेश झोडे, लाखनी तालुका अध्यक्ष आसिफ पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे लाखनी तालुका अध्यक्ष डॉ. विकास गभणे, नागेश पाटील वाघाये, लाखनीचे नगरसेवक धनुभाऊ व्यास, लाखनी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत वाघाये, बबनभाऊ पिलारे आदी उपस्थित होते.




