वाशिम, दि. २० : कारंजा येथील अल्पसंख्यांक लोकसंचालित साधन केंद्र येथे नाबार्डच्यावतीने ‘स्वयंसहाय्यता समूह नेतृत्व विकास कार्यक्रम’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर हे होते.यावेळी ‘नाबार्ड’चे सहाय्यक महाव्यवस्थापक विजय खंडरे, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया कारंजा शाखेचे व्यवस्थापक शहाबाज खान, सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे कारंजा शाखेचे व्यवस्थापक गोविंदकुमार, बँक ऑफ महाराष्ट्र कारंजा शाखेचे व्यवस्थापक कपिल वानखेडे, कॅनरा बँक कारंजा शाखेचे व्यवस्थापक पंकजकुमार, बँक ऑफ बरोडा कारंजा शाखेचे व्यवस्थापक चंद्रशेखर धामगावे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एम. के. राठोड, माविमच्या कार्यक्रम अधिकारी प्रांजली वसाके, आरसेटीचे आशिष राऊत आणि कारंजा तालुक्यातील स्वयं सहाय्यता बचतगटाच्या महिला सदस्य उपस्थित होत्या.
‘नाबार्ड’चे श्री. खंडरे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, महिला बचतगट आणि बँक यामधील दुवा साधण्याचा प्रयत्न नाबार्डच्या या कार्यक्रमाद्वारे करण्यात आला आहे. बचत गट यांना बँकेसंबंधी येणाऱ्या विविध अडचणी आणि त्यावर उपाययोजना याबद्दल मार्गदर्शन करून महिलांनी खर्च व बचत यांचा मेळ कसा लावावा. त्याचबरोबर महिलांनी सुद्धा डिजिटल व्यवहारांची कास धरावी, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी सर्व बँक अधिकाऱ्यांनी स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी बँकामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. तसेच स्वयंसहाय्यता समूह आणि बँक यांच्यामध्ये वारंवार येणाऱ्या अडचणीबद्दल उपाययोजना सुद्धा स्पष्ट केल्या. स्वयंसहाय्यता समूहांतर्गत होत असलेली थकबाकी कशी कमी करता येईल, याबाबत स्वयंसहाय्यता समूहांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. निनावकर यांनी वेगवेगळ्या उदाहरणावरून स्वयंसहाय्यता समूह आणि बँक यामध्ये येणाऱ्या अडचणीचे निराकरण कशाप्रकारे करता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक समूहाने बँकिंग नियमाची पूर्तता करून प्रगतसमूह म्हणून उदयास यावे, असे आव्हाहन केले. आर्थिक साक्षरता व समावेशन, विविध सामाजिक सुरक्षा योजना बद्दल मार्गदर्शन करून बचत गटांच्या विकासाच्या दृष्टीने प्रत्येक बाबींवर प्रकाश टाकला.आरसेटीचे श्री. राऊत यांनी भारतीय स्टेट बँक आरसेटीमध्ये उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाची व उपलब्ध सुविधांची माहिती दिली आणि आरसेटी कार्यपद्धती आणि उद्देश स्पष्ट केले. श्रीमती वसाके यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत महिलांच्या सर्वांगीण विकास याविषयीमार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरसेटी, कारंजा येथील अल्पसंख्यांक लोकसंचालित साधन केंद्राच्या श्रीमती मीरा भड यांनी परिश्रम घेतले.





