27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ उमेदवारांच्या पेड न्यूजवर बारीक लक्ष ठेवावे-जिल्हाधिकारी

उमेदवारांच्या पेड न्यूजवर बारीक लक्ष ठेवावे-जिल्हाधिकारी

0
24

भंडारा दि 23:-  निवडणुकीच्या कालावधीत निवडणूक खर्च लपविण्यासाठी उमेदवार जाहिरात न देता पेड न्युज देतात. मात्र अशा बातम्यांचा प्रभाव थेट मतदारांवर पडत असल्यामुळे  अशा पेड न्युज चे जिल्हा प्रसारमाध्यम सनियंत्रण समितीने सूक्ष्म निरीक्षण करावे. पेड न्युज आढळून आल्यास संबंधित उमेदवारांना तात्काळ नोटीस पाठवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा प्रसारमाध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ नरेश गिते यांनी दिलेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत पेंड न्युज सनियंत्रण आणि जाहिरात प्रमाणिकरणासाठी प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीला भंडारा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वंदना सौरंगपते,  जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश सुपारे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी संदीप लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होते.

 प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि  न्यूज ब्रॉडकस्टर्स असोसिएशन यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार वृत्तपत्र आणि वृत्त वाहिन्यांनी सर्व पक्ष आणि उमेदवार यांना प्रचारासाठी समान जागा आणि वेळ देणे बंधनकारक आहे. एखाद्या विशिष्ट पक्षाचा किंवा उमेदवारांच्या प्रचाराच्या बातम्या वृत्तपत्र आणि वृत्त वाहिन्यांकडून अपेक्षित नाही. प्रसारमाध्यमांनी सुद्धा वस्तुनिष्ठ वृत्तांकनावर भर द्यावा.राजकीय पक्ष व उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये पेड न्यूज चे प्रमाण असते. अशा बातम्यांचे समितीमधील सदस्यांनी सूक्ष्म वाचन करावे. तसेच वृत्त वाहिन्यांवरील बातम्यांवर सुद्धा बारीक लक्ष ठेवावे असेही ते यावेळी म्हणाले.

राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी  दूरचित्रवाणी वाहिन्या, सोशल मीडिया, आकाशवाणी व खाजगी एफ एम, बल्क एस एम एस, मोबाईल व्हॅन यावर प्रसारित होणाऱ्या प्रचाराची जाहिरात जिल्हा प्रसारमाध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसारित करू नये. पूर्व प्रमाणिकरण  केल्याशिवाय जाहिरात प्रसारित केल्यास संबंधित उमेदवारास नोटीस बजावावी, असे निर्देश त्यांनी  यावेळी दिलेत.

उमेदवारांनी करावयाच्या जाहिरातीमधील मजकूर राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारा असू नये. वैयक्तिक टीका टिपणी करू नये. महिलांचे व बालकांचे विकृत चित्रण असू नये, गुन्हेगारीचे उदात्तीकरण, भारतीय घटनेचा अवमान यासाठी प्रतिबंध आहे. या सर्व बाबींची माहिती तिन्ही निवडणुक निर्णय अधिकारी यांना सुद्धा देण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.जाहिरात प्रमाणिकरणासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी जिल्हास्तरीय प्रसारमाध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडे विहित नमुन्यात अर्ज करावा. द्याव्यात. त्यासाठीचा विहित नमुना जिल्हा माहिती अधिकारी आणि सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याडे उपलब्ध आहे. सदर विहित नमुन्यात जाहिरातीच्या स्क्रिप्ट, त्याचा तयार करण्याचा, व प्रसारणाच्या खर्चासाहित विहित कालावधीत सादर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.