30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ सार्वजनिक व खाजगी ठिकाणावरील होर्डिंग बॅनर, पोस्टर्स हटविले

सार्वजनिक व खाजगी ठिकाणावरील होर्डिंग बॅनर, पोस्टर्स हटविले

0
33

 आदर्श आचारसंहिता सुरु होताच ४८ तासात कार्यवाही
भंडारा,दि. २३ :- राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची शनिवारी घोषणा होताच जिल्हयात आदर्श आचार संहिता सुरु झालेली आहे. तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रात आदर्श आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशा निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर जिल्हा प्रशासनाने तीनही क्षेत्रात तात्काळ कार्यवाही करुन २२५२ होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स व पाम्पलेट हटविण्याची कार्यवाही ४८ तासाच्या आत केली आहे. शासकीय व खाजगी ठिकाणी शासकीय कार्यालय परिसरात हे साहित्य लावण्यात आलेले होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा होताच आदर्श आचार संहिता सुरु झालेली आहे. सदर आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषद व नगरपरिषद क्षेत्रातील सार्वजनिक, खाजगी व शासकीय कार्यालय परिसरात तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रातील होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स ४८ तासाच्या आत हटविण्याची कार्यवाही निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. तुमसर क्षेत्रातील सर्वाधिक १५४९, साकोली ५२४ तर भंडारा १७९ असे २२५२ होर्डिग, बॅनर व पोस्टर्स हटविण्यात आले.
आचार संहितेचे उल्लंघन होईल अशा स्वरुपाचे शासकीय सार्वजनिक, खाजगी ठिकाणी होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स लावण्यावर मनाई करण्यात आली आहे. शासकीय परिसरात लावण्यात आलेले २४ तास, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले ४८ तास तर खाजगी ठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स ७२ तासात हटविण्यात यावे, असे सख्त निर्देश निवडणूक आयोगाचे आहेत. या निर्देशांन्वये जिल्हयातील तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. हटविण्यात आलेले जागेवरील फलक पुर्ववत लावण्यात येणार नाही याबाबत स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. तीनही ठिकाणी हटविण्यात आलेल्या होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स यापैकी नगर परिषद क्षेत्रातील सार्वजनिक स्थळावरील २४ तासात ३३९ तर ४८ तासात २८३ बॅनर हटविण्यात आले.