
गोंदिया,दि.26- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली असून गोंदिया जिल्ह्यातील ४ ही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षासोबंतच स्थानिक पक्ष आघाड्यांनीही तयारी सुरु केली आहे.वंचित बहुजन आघाडीने तर येत्या निवडणुकीसाठी ४ विधानसभा मतदारसंघात उमेदवार रिगंणात उतरविण्याच्या दृष्टीने गुरुवारला जिल्हास्तरीय मेळावा आयोजित केला आहे.त्यातच गेल्या पाच वर्षापासून गोंदिया जिल्ह्यात अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभीमान पक्षाने गोंदिया विधानसभा मतदारसंघाला डोळ्यासमोर ठेवून काम सुरु केले आहे.या मतदारसंघात युवा स्वाभीमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी पाच वर्षापासून बुथस्तरापासून गावपातळीवर तालुकापातळीवर संघटन तयार करण्याचे काम केले आहे.लोकसभा निवडणूकीत सुध्दा रिगंणात उतरण्याची तयारी केली होती.परंतु काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीमुळे त्यांनी लोकसभेत माघार घेतली होती.मात्र विधानसभेच्या निवडणुकीत गोंदिया मतदारसंघात जितेश राणे हे युवा स्वाभीमानचे उमेदरावर राहणार असून त्यांच्या प्रचाराला सुरवात झाली आहे.त्यांच्या नामनिर्देशनपत्रासाठी येत्या ३ ऑक्टोंबरला खासदार नवनित राणा व पक्षाचे संस्थापक आमदार रवी राणा हे येणार असल्याने गोंदिया विधानसभा मतदारसंघात चागंली लढाई होण्याची चिन्हे आहेत.त्यातच बहुजन समाज पक्षाने सुध्दा ४ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उतरविण्याची तयारी केली आहे.गेल्या काही दिवसापुर्वी बसपचे जिल्हा प्रभारी नगरसेवक पंकज यादव यांनी बसप सोडून शिवसेनेत प्रवेश केला मात्र त्यांच्यासोबत एकही नगरसेवक न गेलेला नाही.बहुजन समाज पक्ष नेहमीच रिंगणात राहिलेला आहे.मात्र यावेळी ते स्थानिक पातळीवर वंचित बहुजन आघाडीसोबत जातात की स्वतंत्र लढतात याकडे बघावे लागणार आहे.या सर्वांच्या विपरीत परिस्थितीत आहे ती मनसे ची मनसेने आजपर्यंत निवडणुकीच्या दृष्टीने कुठलीही हालचाल गोंदिया जिल्ह्यात केलेली नाही.त्यामुळे हा पक्ष जिल्ह्यात तर फक्त नावालाच म्हणावे लागणार आहे.याउलट भारतीय कम्युनिस्ट पार्टि व गोंडवाणा गणतंत्र पक्षानेही विधानसभा निव़डणुकीची तयारी सुरु केली आहे.




