Ø मतदान जागृतीसाठी अंकित नागपुरे ची दिव्यांग आयकॉन म्हणून नियुक्ती
भंडारा ,दि 28 (जिमाका):- निवडणूक आयोगाचा दिव्यांग मतदार आणि महिला मतदारांवर भर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार संघ निहाय असलेल्या मतदार यादीत दिव्यांग मतदारांची नावे आली नसल्यास अशा मतदारांचा ग्रामपंचायत, नगर पंचायत व नगर पालिका क्षेत्रात शोध घेऊन त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करावी. या विधानसभा निवडणुकीत दिव्यांगाचे दिव्यांग मतदारांचे 100 टक्के मतदान करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ नरेश गीते यांनी दिल्यात.
मतदार जनजागृती, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत जिल्ह्यात सुरु असलेल्या कार्यक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जागताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ. सुभाष पवार, स्वीपच्या नोडल अधिकारी मृणालिनी भूत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि दिव्यांग नोडल अधिकारी मंजुषा ठवकर उपस्थित होत्या.
अंध मतदारांसाठी मतदान जनजागृती साहित्य हे ब्रेल लिपीमध्ये छपाई करून घ्यावे. ज्या गावांमध्ये दिव्यांग मतदार आहेत मात्र त्यांची नावे मतदार यादीत नाहीत अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी प्रयत्न करावेत. दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती होण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले अपंग कर्मशाळेतील अंकित नागपुरे या विद्यार्थ्याला दिव्यांग आयकॉन म्हणून निवडण्यात आले .
प्रत्येक मतदान केंद्रावर, ग्रामपंचायत मध्ये व्हीव्हीपॅट आणि इव्हीएम जनजागृती करताना लोकांना मतदान करण्यास सांगावे. जेणे करून मतदारांना इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती होईल. शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळेतील विद्यार्थ्यानाकडून संकल्प पत्र भरून घ्यावीत. जिल्ह्यातील सुमारे 70 हजार विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्राच्या माध्यमातून जनजागृती करावी. महाविद्यालयात मतदार साक्षरता क्लबच्या माध्यमातून भविष्यातील मतदार, नवीन मतदार, शाळाबाह्य व महाविद्यालायत न जाणारे मतदार यांच्यासाठी चुनावी पाठशाळा याच्या माध्यमातून जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
स्वच्छता ही सेवा, पोषण आहार आणि आरोग्या संदर्भात घेण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमात मतदार जनजागृती करावी. महिलांना याबाबत माहिती देण्यासाठी आणि त्यांची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी माविम आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे बचत गटातील महिलांसाठी कार्यक्रम घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यात. मतदार जनजागृतीसाठी जिल्हयाच्या ठिकाणी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करावे. तसेच तालुका स्तरावर सुध्दा मतदान जनजागृती रॅली काढावी.




