वाशिम, दि.01 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ ऑक्टोंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांनी मतदान करावे, यासाठी विविध सोयी-सुविधा पुरविण्याचे नियोजन करण्यात येत असून जिल्ह्यात दिव्यांग मतदारांचे १०० टक्के मतदान नोंदविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित विविध स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी अनंत मुसळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हरण यांच्यासह अधिकारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, प्रत्येक दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी दिव्यांग मतदारांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये त्यांना मोफत वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर व मतदान केंद्रांवर मदतीसाठी स्वयंसेवक नेमण्याचे नियोजन आहे. याकरिता दिव्यांग मतदारांच्या मतदान केंद्रनिहाय याद्या बनविण्याचे काम सुरु आहे. दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा याकामी जिल्हा निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे. तसेच जास्तीत जास्त दिव्यांग मतदार मतदानादिवशी मतदानासाठी बाहेर पडतील, यासाठी जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.





