मतदान करा; लोकशाही बळकट करा..!
- वाशिम जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘स्वीप’ अंतर्गत आयोजन
- ५०० पेक्षा अधिक सायकलपटू सहभागी; महिलांचा लक्षणीय सहभाग
- आदित्य इंगोले, योगिता कव्हर विजेते; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण
वाशिम, दि. ०२ : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी वाशिम जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ‘स्वीप‘ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. याचाच भाग म्हणून युवा, नवमतदार व महिला मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी आज सायकलथॉन स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आले होते. यासर्धेत ५०० पेक्षा अधिक सायकलपटू सहभागी झाले होते. विद्यार्थिनी, महिला सायकलपटूची संख्याही लक्षणीय होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप‘ उपक्रमाचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथून सकाळी ७.३० वाजता स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा ‘स्वीप‘चे सहाय्यक नोडल अधिकारी सुभाष राठोड, नारायण व्यास, अलका गिऱ्हे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथून लाखाळा मार्गे रिठद व रिठद येथून पुन्हा पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स असे एकूण ३१ किलोमीटरचे अंतर स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आले होते. ४५ मिनिटात हे अंतर पूर्ण करणारा आदित्य इंगोले पुरुष गटातून विजेता ठरला. तर महिलांमध्ये योगिता कव्हर हिने विजेतेपद पटकाविले. पुरुष गटात हनुमान दराडे, अनिकेत मापारी यांनी तर महिला गटात महिला पोलीस कर्मचारी निलोफर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते सर्वांना प्रमाणपत्र व पदक देवून सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांनाही यावेळी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
शहरातील सायकलिंग ग्रुप, महाविद्यालयांचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी)चे विद्यार्थी यांच्यासह पोलीस दल, आरोग्य विभाग व इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, क्रीडा संघटना, क्रीडा शिक्षकांनी या सायकलथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. बी. एस. हरण यांच्यासह शेख वासिम, शेख अतिक यांच्या वैद्यकीय पथकाने स्पर्धांना आरोग्य सुविधा पुरविल्या. तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राठोड यांच्या पथकाने स्पर्धेच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
दिव्यांग, चिमुरड्यांनीही नोंदविला सहभाग
मतदार जागृतीसाठी आयोजित सायकलथॉनमध्ये वज्रेश्वर मोरे व सौम्या विजय आरु हे दोन ८ वर्षीय सायकलपटू सुध्दा सहभागी झाले होते. तसेच कृष्णा ढेकणे या दिव्यांग सायकलपटूनेही सायकलथॉनमध्ये सहभागी होवून स्पर्धा पूर्ण केली. विधानसभा निवडणुकीत सर्व दिव्यांग बांधवांनी मतदान करून लोकशाही सदृढ करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहनही त्याने यावेळी केले. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते या तीनही स्पर्धकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
लोकशाही बळकट करण्यासाठी अवश्य मतदान करा : जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
मतदार जागृतीचा संदेश पोहोचविण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने ‘स्वीप’ अंतर्गत सायकलथॉनचे आयोजन केले होते. या उपक्रमाला वाशिमकरांनी अतिशय उत्स्फूर्त व मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग बांधवांनी मतदार जागृतीसाठी दाखविलेला उत्साह अतिशय आशादायी आहे. याच उत्साहाने सर्व वाशिमकरांनी व जिल्हावासियांनी २१ ऑक्टोंबर रोजी मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी सायकलथॉनच्या बक्षीस वितरणप्रसंगी केले.
महिला, दिव्यांग मतदारांनी आपला हक्क बजावावा : दीपक कुमार मीना
२१ ऑक्टोंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत असून जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विविध उपक्रम हाती घेतले जात आहे. आज नवमतदार, महिला व दिव्यांग मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सायकलथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सायकलथॉनमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांनी आपल्या कुटुंबियांना, मित्र-परिवार, नातेवाईकांना २१ ऑक्टोंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन करावे. विशेषतः प्रत्येक महिला मतदार व दिव्यांग मतदार मतदान करतील, यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ उपक्रमाचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांनी सायकलथॉनच्या उद्घाटनप्रसंगी केले.
युवा मतदारांनी आपला हक्क बजवावा : वसंत परदेशी
मतदान हक्क प्रत्येकाने बजाविला पाहिजे. विशेषतः युवा मतदारांनी आवर्जून मतदान करावे. यामाध्यमातून मतदारांना आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळते व ही संधी पाच वर्षातून एकदाच येते. त्यामुळे येणाऱ्या २१ ऑक्टोंबर रोजी सर्व पात्र मतदारांनी अवश्य मतदान करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले.




