27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय अग्रवालांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची दाणादाण

अग्रवालांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची दाणादाण

0
25

गोंदिया,दि.02- गेल्या अडीच दशकापासून विधानसभेवर १५ वर्षे आणि विधानपरिषदेवर १२ वर्षे अशी २७ वर्षे काँग्रेसचे आमदार म्हणून गोंदिया जिल्ह्यात राज करणारे काँग्रेसचे एकमेव आमदार गोपालदास अग्रवाल यांनी अखेर बदलत्या राजकीय समिकरणांना अनुसरून भारतीय जनता पक्षात अखेर प्रवेश केला. गोंदिया मतदारसंघातून सतत तीनवेळा आमदार निवडून येणारे ते पहिले आमदार आहेत. हा पंचवार्षिक काळ सोडला तर आधीची १० वर्षे काँग्रेसची सत्ता असतानाही त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याची खुमखुमी त्यांनी पक्षांतराने काढली. गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांचे राजकारण सुद्धा त्यासाठी तेवढेच महत्त्वाचे असल्याचे अग्रवाल समर्थकांचे मत आहे. २०१४ पासून राज्यासह केंद्रात सत्ता बदलाचे चालले वारे आणि राज्यात काँग्रेसची होत असलेली पडझड बघता राजकारणात काही करायचे असेल तर सत्तेसोबतच राहणे योग्य, हे तंत्र स्वीकारत त्यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला.
जिल्हा परिषद असो की पंचायत समिती, या निवडणुका सर्व गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्वात गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसने लढविल्या. अग्रवाल हेच एकमेव या जिल्ह्यात काँग्रेसचे पालनकर्ता होते. त्यांच्या काँग्रेस सोडल्याने मात्र सध्याच्या घडीला वजनदार असा नेता काँग्रेसमध्ये राहिलेला नाही. त्यांच्या भाजपप्रवेशामुळे गोंदिया विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसला आपल्या उमेदवाराची निवड करताना चांगलीच दमछाक करावी लागत आहे. नव्या उमेदवाराला काँग्रेस उमेदवार म्हणून गावागावात प्रचार करण्याची वेळ ही अग्रवाल यांच्या कृतीमुळे मिळू शकली नाही. गोंदिया विधानसभा मतदारसंघात अग्रवाल म्हणजेच काँग्रेस असे समीकरण होते. तसेही अग्रवाल भाजपमध्ये जाणार ही चर्चा काँग्रेसमध्ये अनेक दिवसापासून होती. असे असताना सुद्धा काँग्रेस गाफील राहिली. यामुळे गोंदिया विधानसभा मतदारसंघात नवे नेतृत्व तयार करण्याची पक्षाच्या नेत्यांनी तसदी घेतली नाही. ही आत्मघातकी वेळ काँग्रेसने स्वतःहून ओढवून घेतली आहे. गोंदिया जिल्ह्यात पक्षाची असलेल्या वाटचालीवर काँग्रेसश्रेष्ठी डोळ्यावर पट्टी बांधून होते.

लोकसभा निवडणुकीत पक्षाचे घटलेले मताधिक्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपशी होत असलेली नतद्रष्ट युती याकडे केलेली डोळेझाक काँग्रेसला रसातळाला नेण्यात महत्त्वाची ठरली. राज्याच्या विधानसभेत गेल्या पाच वर्षातील आमदार अग्रवालांची हालचाल सुद्धा काँग्रेसला टिपता येऊ नये, हे हास्यास्पद ठरले आहे. तरीही प्रदेश काँग्रेस सचिव अमर वराडे,विजय बहेकार यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. यावेळी काँग्रेस पोवार उमेदवार देणार असा चर्चांना सुरवात करून त्यादृष्टीने माजी जि.प सभापती पी.जी.कटरे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांच्या नावाची चर्चा माजी खासदार नाना पटोलेंनी पक्षपातळीवर चालवली. ओबीसी चेहरा म्हणूनही शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, अग्रवाल यांची आधीचीच आखणी अन काँग्रेसच्या उमेदवाराला एैनवेळेवर मिळणारी उमेदवारी यात खूप अंतर राहणार आहे. अग्रवाल गेल्या दीड दशकापासून आमदार असल्याने मतदारसंघात भाजपच्या नेत्यांसह कार्यकत्र्यांमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल विरोध व आकस नक्कीच दिसून येत आहे. परंतु, पक्षाच्या निर्णयासमोर कोणाचेही काहीही चालत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजपचे प्रबळ दावेदार आणि निष्ठावंत असलेले विनोद अग्रवाल यांचा गोपालदास अग्रवालांच्या पक्षप्रवेशामुळे चांगलाच कोंडमारा झाला आहे.  शिवसेनेचा मतदारसंघ असलेला गोंदिया हा भाजपकडे ओढत मुख्यमंत्र्यांनी गोपालदास अग्रवाल यांचा एक्का वापरला. आमदार अग्रवाल यांनी सुद्धा काँग्रेसचे आमदार असून भाजपला मदत केल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना पटवून देत अग्रवाल यांचेसाठी पक्ष कार्यकत्र्यांच्या भावनांचा बळी दिला.
अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाने गोंदिया पंचायत समिती ही पूर्णता भाजपमय होणार आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षासह विधानसभा मतदारसंघातील जि.प.सदस्यांनीही भाजप प्रवेशाला संमती दिल्याने जिल्हा परिषदेतील सत्ताही भाजपमय झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेत आ.अग्रवाल यांच्याच कृपेमुळे भाजप सत्तेत आहे हे सुद्धा नाकारून चालणार नाही.