29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय भंडार्‍याची जागा पिरिपाला?

भंडार्‍याची जागा पिरिपाला?

0
26

भंडारा,दि.03ः-विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या भंडारा विधानसभेची जागा घटकपक्ष असलेल्या पिरिपा (कवाडे) ला देण्यात आल्याची माहिती आल्याने जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी कॉंग्रेस व युवक कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी राजीनामा देण्याचा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत दिला. पिरिपाला जागा देण्याच्या निर्णयामुळे कॉंग्रेस पदाधिकार्‍यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.
आघाडीच्या धोरणानुसार भंडारा विधानसभेची जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आली आहे. तब्बल ३0 वर्षानंतर ही जागा आपल्याला मिळाल्याने कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु, आघाडीचा घटकपक्ष असलेल्या पिरिपा (कवाडे) गटाने या जागेवर दावा केल्याने कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यामुळेच इतक्या वर्षानंतर मिळालेल्या या जागेवर पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी कॉंग्रेस व युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचा इशारा जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष राकेश कारेमोरे, एनएसयुआय अध्यक्ष पवन वंजारी, विधानसभा अध्यक्ष भूषण टेंभूर्णे यांनी दिला.
३0 वर्षांपूर्वी ही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला होती. परंतु, नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने या जागेवर ताबा मिळविला. दरम्यानच्या काळात अनेकदा ही जागा कॉंग्रेसला देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. आता कुठे या जागेवरुन कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असताना पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाने कॉंग्रेसमध्ये असंतोष खदखदत आहे.