29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक गोंडवाना विद्यापीठाकडून समाजाच्या अनेक अपेक्षा- अमर हबीब

गोंडवाना विद्यापीठाकडून समाजाच्या अनेक अपेक्षा- अमर हबीब

0
63

गडचिरोली,दि.03ः-गोंडवाना विद्यापीठाकडून समाजाच्या अनेक अपेक्षा आहेत. विद्यापीठाला भविष्यात खूप महत्व प्राप्त होणार आहे, असे प्रतिपादन अंबेजोगाई येथील ज्येष्ठ पत्रकार व साहित्यीक अमर हबीब यांनी केले.गोंडवाना विद्यापीठाचा आठवा वर्धापन दिन २ ऑक्टोबर रोजी आरमोरी मार्गावरील संस्कृती सभागृहात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, सुप्रसिध्द समाजसेवक देवाजी तोफा, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य, अधिष्ठाता, संचालक, विद्यापीठाचे अधिकारी, महाविद्यालयांचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य, प्राध्यापक, पत्रकार, विद्यापीठाचे व संलग्नीत महाविद्यालयांचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. कल्याणकर म्हणाले, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जन्मदिनी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आज आठ वष्रे विद्यापीठाला पूर्ण होत आहेत. विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतला असता, त्यामध्ये शैक्षणिक कार्याची सुरूवात खर्‍या अर्थाने आता विद्यापीठामध्ये सुरू झाली आहे. त्यासाठी लागणारे प्राध्यापक नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शासनाकडून नवीन सात पदव्युत्तर शैक्षणिक विभागांना पदांसह मंजुरी मिळालेली आहे. विद्यापीठाच्या जागेचाही प्रश्न लवकरच सोडविला जाईल व विद्यापीठाला हक्काची जागा मिळेल. तसेच विद्यापीठाने पीएच.डी. संशोधनासाठीची पेट परीक्षा पार पाडली आहे. त्यामुळे विद्यापीठामध्ये संशोधन कार्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी समाजसेवक देवाजी नवलू तोफा यांना जीवन साधना गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यामध्ये सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तुकूम चंद्रपूरचे प्रा. डॉ. जनार्धन काकडे यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, उच्चश्रेणी लिपीक निलेश काळे यांना उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार वर्ग-३, उद्यानरेजा अमोल रंगारी यांना उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार वर्ग-४, गोविंदराव वारजूरकर कला, वाणिज्य महाविद्यालय नागभिडचे मुख्य लिपीक पांडूरंग चौधरी यांना उत्कृष्ट महाविद्यालयीन कर्मचारी पुरस्कार, गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाचे सचिन भरडे यांना उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार, महिला महाविद्यालय गडचिरोलीची नुरसबा सय्यद हिला उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
तसेच विद्यार्थी विकास विभागातर्फे शैक्षणिक सत्र २0१७-१८ व २0१८-१९ करीता घेण्यात आलेले आंतर महाविद्यालयीन वार्षिकांक पुरस्कार प्रथम क्रमांक गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा, व्दितीय महिला महाविद्यालय गडचिरोली, तृतीय सत्र २0१७-१८ शिवाजी महाविद्यालय राजरा, तृतीय क्रमांक सत्र २0१८-१९ ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव तसेच उत्तेजनार्थ (गडचिरोली जिल्हा) सत्र २0१७-१८ महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी, सत्र २0१८-१९ शिवाजी महाविद्यालय गडचिरोली व उत्तेजनार्थ (चंद्रपूर जिल्हा) सत्र २0१७-१८ सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर व सत्र २0१८-१९ निलकंठराव शिंदे महाविद्यालय भद्रावती यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे देण्यात येणारा महाविद्यालय रासेयो एकक पुरस्कार विद्यापीठस्तरीय वनश्री महाविद्यालय कोरची, जे. एस. पी. एम. महाविद्यालय धानोरा, सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली, उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी विद्यापीठस्तरीय वनश्री महाविद्यालय कोरचीचे प्रा. प्रदिप चापले, जे.एस.पर.एम. महाविद्यालय धानोराचे डॉ. गणेश चुधरी, सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोलीचे डॉ. सुभाष गिरडे, उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरचे राजेश हजारे, वनश्री महाविद्यालय कोरचीचे प्रिती मुलेटी यांना देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्याकडून व्यसनमुक्ती संदर्भातील शपथ देण्यात आली. आभार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ईश्‍वर मोहुर्ले यांनी मानले.