रॅलीमधून ठिकठिकाणी मतदारांना दिले संदेश
गडचिरोली : विधानसभा निवडणूकीचा बिगूल महत्वाच्या वळणावर येवून पोहचल्यानंतर मतदारांना निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून आज शहरात मोठया प्रमाणात रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन शिवाजी कॉलेज येथे अति.पोलीस निरीक्षक तथा स्वीप समितीचे सदस्य सचिव डॉ.मोहीत गर्ग यांनी केले. जवळपास 2300 विद्यार्थ्यांनी यावेळी शहरातील वेगवेगळया ठिकाणी मतदारांना मतदान करण्याचे संदेश दिले. शिक्षण विभाग माध्यमिक व स्वीप समिती, निवडणूक विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीचे कार्यक्रम जिल्हयात राबविण्यात आले. यावेळी गडचिरोली शहरातील स्कुल ऑफ स्कॉलर्स, शिवाजी कॉलेज, कमलाताई मुनघाटे हायस्कुल, जिप कॉम्प्लेक्स माध्य.शाळा, विद्याभारती माध्य. मुलींची शाळा, भगवंतराव माध्य.शाळा व वसंत माध्य.शाळा यांचा समावेश होता. वेगवेगळया रॅलीमध्ये नियोजनासाठी शिक्षणाधिकारी माध्य व प्राथमिक, निवडणुक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.गडचिरोली जिल्हयातील मतदानाचा टक्का वाढावा तसेच मतदारांना विविध निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती मिळावी हा प्रमुख उद्देश ठेवून स्वीप अंतर्गत जिल्हयात कार्यक्रामांचे आयोजन केले जात आहे.
तालुकास्तरावरही मतदार जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन : भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातही प्रशासनाकडून मतदार जनजागृती विषयक फिल्म शो दाखवून माहीती दिली. याठिकाणी तहसिलदार कैलास अंडील यांनी नियोजन केले. लक्ष्मीबाई विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथ रॅलीद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.




