28.5 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home महाराष्ट्र cVIGIL: आचारसंहिता उल्लंघन झाल्यास मोबाईल अॅपवर करा तक्रार

cVIGIL: आचारसंहिता उल्लंघन झाल्यास मोबाईल अॅपवर करा तक्रार

0
42

निवडणुक आयोगाचा तिसरा डोळा – cVIGIL मोबाईल अॅप

गडचिरोली,दि.06 : निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीबाबत  दि. २१ सप्टेबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. उमेदवारांनी नामनिर्देशन भरण्याचा कालावधी संपलेला असून आता उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. गडचिरोली जिल्हयात निवडणुका व्यवस्थित पार पडाव्यात म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत मतदारसंघात होत असलेल्या गुन्ह्यांची, अफरातफरीची, नियमांचे उल्लंघन करण्याची माहिती आयोगाला प्राप्त व्हावी यासाठी हेल्पलाईल 1950 बरोबर आयोगाने cVIGIL हे मोबाइल अॅप लाँच केले आहे.

निवडणूक आयोगाच्या या अॅपवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. तक्रार केल्यानंतर १०० मिनिटांच्या आत यावर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे. मतदारांची उमेदवारांविषयी तक्रार असल्यास ते या अॅपवर तक्रारीबाबत फोटो आणि व्हिडिओ सुद्धा पाठवू शकणार आहेत. गुगल प्ले स्टोरमधून cVIGIL हा अॅप डाउलोड केल्यानंतर या अॅपमध्ये मोबाइल नंबरसह काही प्रमाणात माहिती भरावी लागते. त्यानंतर वापरकर्त्याची अधिकृत नोंदणी होईल. या अॅपमधून कॅमेरा ओपन करून व्हिडिओ रेकॉर्डही करू शकता किंवा फोटो क्लिक करून तो निवडणूक आयोगाला पाठवण्याची  सोय या अॅपमध्ये आहे.

या अॅपमधून निवडणूक आयोगाला लोकेशनची माहितीही देवू शकता येते. कोणत्या ठिकाणी उमेदवारांकडून नियमांचा भंग होत आहे, मतदारांना आमिष किंवा पैसे वाटणे सुरू आहे हे सर्व रेकॉर्ड करता येवू शकते. या अॅपमध्ये एक डिस्क्रिप्सन बॉक्सही देण्यात आला आहे. यात मतदार काही माहिती टाइप करू शकतात. यात किती जणांनी तक्रार केली. किती तक्रारीरींची निवडणूक आयोगाने दखल घेतली, हे सर्व या अॅपमधून मतदारांना दिसू शकणार आहे.

विधानसभा निवडणुकामध्ये मतदारांच्या सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने सी व्हीजील, व्होटर्स हेल्पलाइन आणि पीडब्ल्यूडी अॅप्स उपलब्ध करून दिले आहेत. आचारसंहितेचा भंग होत असेल तर याबाबतची माहिती नागरिकांनी निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगाने सी व्हीजील या मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप्स आता चांगलेच प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. या अॅप्सद्वारे नागरिक निवडणुकीच्या काळात खोट्या बातम्या, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, मतदारांना पैसे देणे, मादक पदार्थांचे प्रलोभन किंवा वितरण, चिथावणीखोर भाषणे आदि बाबींची तक्रार सी व्हीजील अॅप्सचा वापर करून करू शकतात. निवडणुक आयोगाचा तिसरा डोळा म्हणून हे ॲप कार्य करणार असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.