वाशिम, दि. ०६ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त मतदान अधिकारी यांची दुसरे सरमिसळीकरण शनिवारी सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू यांच्या उपस्थितीत एनआयसीने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे झाले.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, महसूलचे उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, वाशिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी राजेंद्र जाधव, मनुष्यबळ व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी प्रशांत जाधव, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, श्री. बिंदू यांचे संपर्क अधिकारी प्रशांत बोरसे आदी उपस्थित होते.
मतदान अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी जिल्ह्यातून एकूण ८ हजार १३१ अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती एनआयसीच्या प्रणालीवर अपलोड करण्यात आली. यामधून संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने प्रथम सरमिसळीकरणाद्वारे ६ हजार ६९२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रस्तरीय पथके तयार करण्यासाठी शनिवारी संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने दुसरी सरमिसळीकरण प्रक्रिया झाली. यामाध्यमातून आता विधासभा मतदारसंघनिहाय मतदान अधिकाऱ्यांची पथके नेमून देण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर दोन मतदान अधिकारी अशा चार अधिकाऱ्यांच्या समावेश असणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्रांच्या तुलनेत सुमारे १० टक्के पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. यानंतर तिसऱ्या टप्प्यातील सरमिसळीकरणाद्वारे मतदान अधिकाऱ्यांच्या पथकांना मतदान केंद्रांनिहाय नेमणूक दिली जाणार आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय नेमून दिलेली पथके
| विधानसभा मतदारसंघ | मतदान केंद्रे (सहाय्यकारी मतदान केंद्रांसह) | नेमणूक करण्यात आलेली पथके |
| ३३-रिसोड | ३३१ | ३६५ |
| ३४-वाशिम | ३६९ | ४०६ |
| ३५- कारंजा | ३५२ | ३८८ |
| एकूण | १०५२ | ११५९ |




