· सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक
· आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना
वाशिम, दि. ०७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आज सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू व कायदा व सुव्यवस्था (पोलीस) निवडणूक निरीक्षक मोहम्मद रहेमान यांनी आढावा घेतला. तसेच आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन राजेंद्र जाधव, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, तहसीलदार शीतल सोलट, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी विनय राठोड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर आदींची उपस्थिती होती.
सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. बिंदू यावेळी म्हणाले, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात होईल. या काळात त्यांच्याकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर त्वरित आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. खासगी मालमत्ता, घरांवर झेंडे, फलक, पोस्टर्स लावण्यासाठी सुध्दा परवानगीची आवश्यकता आहे. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त पथकांनी याबाबत सजग राहून विना परवानगी लावण्यात आलेल्या झेंडे, फलक, पोस्टर्स प्रकरणी आवश्यक कार्यवाही करावी. सर्व स्थिर सर्वेक्षण पथके, फिरती पथकांनी आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
कायदा व सुव्यस्था निवडणूक निरीक्षक मोहम्मद रहेमान यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, बंदोबस्त नियोजन, मतदान केंद्रनिहाय बंदोबस्त, बाहेर राज्यातून येणारी अतिरिक्त पोलीस कुमुक आदी बाबींचा त्यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, निवडणुका शांतता व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत करण्यात येत असलेल्या निवडणूक पूर्वतयारीची माहिती निवडणूक निरीक्षकांना दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने सर्व आवश्यक पूर्वतयारी केली आहे. ‘स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असून ईव्हीएम-व्हीव्हीपॅट विषयी जनजागृती केली जात आहे. तसेच दिव्यांग मतदारांचे १०० टक्के मतदान होण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदान केंद्रांवर पुरविल्या जाणाऱ्या किमान मुलभूत सुविधा, टपाली मतपत्रिका, मनुष्यबळ, मतदान यंत्रे, मतदान केंद्रनिहाय नियोजन, पोलीस बंदोबस्त, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, निवडणूक खर्च संनियंत्रण आदी बाबींचा यावेळी आढावा घेण्यात आला




