भंडारा, दि 7 :- उपविभागीय कार्यालयात सुरू असलेले निवडणूक संदर्भातील कामकाज व्यवस्थित केले जातेय की नाही, याबाबत पाहणी करण्यासाठी निवडणूक निरीक्षक राजेश सिंग राणा यांनी तुमसर आणि भंडारा उपविभागीय कार्यालयाला भेट दिली.विधानसभा निवडणुकी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवार आणि नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक कक्ष सुरू करण्यात येतात. निवडणूक निरीक्षक राजेश सिंग राणा यांनी भंडारा आणि तुमसर येथील कार्यालयात भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. त्याचबरोबर चंद्रपूर आणि दुधाळा, सरपेवाडा येथील मतदान केंद्रावरील सोयी, सुविधांची पाहणी करून मतदान केंद्रावर किमान सुविधा उपलब्ध करून देण्याचा सूचना केल्यात.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेले तक्रार निवारण कक्ष, उमेदवारांना द्यावयाच्या विविध परवानग्या देणारा कक्ष, मतदान जागृती कक्ष आदींना भेट दिली. प्रत्येक कक्षाचे कामकाज आणि आलेल्या तक्रारी आणि तक्रारींचे केलेले निवारण याची माहिती जाणून घेतली. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याशी निवडणुकीच्या तयारी बाबत चर्चा केली. यासोबतच दोन्ही विधानसभा क्षेत्रात मतमोजणीचे ठिकाण आणि स्ट्रॉंगरूमची पाहणी केली. निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे मतदान टपाल मतपत्रिकेद्वारे करून घेण्याचा सूचना त्यांनी उपविभागीय अधिका-यांना दिल्यात .
सर्व मतदान केंद्रावर वीज, रॅम्प, दिव्यांगासाठी व्हील चेअर, पाणी , स्वच्छतागृह इत्यादी किमान सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही निर्देश दिलेत. यावेळी त्यांनी स्ट्रॉंगरूम आणि मतमोजणी केंद्राची सुद्धा पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ आणि तुमसरला नितीन सदगीर उपस्थित होते.
जंगलव्याप्त चंद्रपूर, आणि दुधाला सरपेवाडा मतदान केंद्रांना भेट
भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्यालागत असलेले चंद्रपूर आणि सारकापूर या दोन गावातील मतदान केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. या केंद्रावर किमान सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्यात. या मतदान केंद्रावर किती मतदान होते याबाबत विचारणा केली. तसेच मतदान केंद्र अधिकारी यांनी स्वतः मतदान चिट्ठी वाटप करावे अशा सूचना दिल्यात .




