वाशिम, दि.११ : दूरचित्रवाणी वाहिन्या, रेडीओ, चित्ररथ, बल्क अथवा व्हाईस मेसेज, सिनेमागृह, सोशल मीडिया संकेतस्थळे आदी विविध माध्यमांतील जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून करून घेणे उमेदवारांना बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच वृत्तपत्रांमध्ये शेवटच्या ४८ तासात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती सुद्धा पूर्व प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी आपल्या जाहिरातीचे प्रसारणाच्या तीन दिवस अगोदर पूर्वप्रमाणीकरणासाठी अर्ज जाहिरातीच्या मसुद्यासह जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडे सादर करावा. सदर मसुद्याचे समितीतील सदस्यांकडून परीक्षण होऊन त्याला जिल्हा निवडणूक अधिकारी यांची मान्यता घेऊन दोन दिवसांत जाहिरातीचे प्रमाणपत्र संबधितांना देण्यात येईल. टीव्ही अथवा केबल नेटवर्क किंवा रेडीओवर प्रक्षेपित करावयाच्या जाहिरातींचा व्हिडीओ, ऑडीओ त्यातील संवादासह लेखी मजकूर दोन प्रतींत द्यावा. त्याचप्रमाणे, जाहिरात तयार करावयास आलेला खर्च, जाहिरातीचा वेळ, प्रक्षेपणासाठीचा खर्च व इतर तपशीलांसह कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.




