
- ४८ तासांत खुलासा सादर करण्याची अनुपस्थित उमेदवारांना नोटीस
वाशिम, दि. १2 : निवडणूक खर्चाच्या पहिल्या तपासणीस वाशिम विधानसभा मतदारसंघातील दोन उमेदवार आणि रिसोड विधानसभा मतदारसंघातील सहा उमेदवार अनुपस्थित होते. या उमेदवारांना नोटीस बजावून ४८ तासांत खुलासा सादर करण्याबाबत कळविण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक नरेंद्र सिंग यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या.
यावेळी निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी चंद्रकांत खारोडे, श्री. सिंग यांचे संपर्क अधिकारी तथा सहाय्यक निधी लेखाचे सहाय्यक संचालक संतोष कंदेवार, वाशिमचे सहाय्यक खर्च निरीक्षक एम. व्ही. तायडे, रिसोडचे सहाय्यक खर्च निरीक्षक युसुफ शेख उपस्थित होते. खर्च तपासणी वेळी काही उमेदवारांच्या खर्च अभिलेख्यांमध्ये त्रुटी आढळून आल्या. संबंधित उमेदवारांनी पुढील तपासणी वेळी त्रुटींची पूर्तता करून आवश्यक अभिलेख सादर करावेत, अशा सूचनाही श्री. सिंग यांनी दिल्या आहेत. यावेळी उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांना निवडणूक खर्च नोंदणीविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.
वाशिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची खर्च तपासणी आज सकाळी ११ वाजता झाली. यावेळी १३ पैकी ११ उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर लखन सहदेव मलिक (भारतीय जनता पार्टी), संतोष बन्सी कोडीसंगत (प्रहार जनशक्ती पक्ष) हे दोन उमेदवार अनुपस्थित होते. रिसोड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी दुपारी २ वाजता रिसोड येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झाली. यावेळी १६ पैकी १० उमेदवार उपस्थित होते, तर ६ उमेदवार अनुपस्थित होते. यामध्ये शेख खाजा शेख फरीद (बहुजन समाज पार्टी), डॉ. प्रशांत गावंडे पाटील (संभाजी ब्रिगेड पार्टी), राजेश श्रीकृष्ण अंभोरे (बहुजन विकास आघाडी), चेतन वामनराव इंगळे (अपक्ष), तसव्वरखॉ गुलाम गौसखॉ (अपक्ष), अनिल रंगराव घुगे (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.
कारंजा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची आज तपासणी
कारंजा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी शनिवार, १२ ऑक्टोंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी कारंजा मतदारसंघातील सर्व उमेदवारांना खर्च अभिलेख तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.




