
वाशिम, दि. १३ : कारंजा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची प्रथम निवडणूक खर्च तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक नरेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत १२ ऑक्टोंबर २०१९ रोजी झाली. यावेळी चार उमेदवारांनी निवडणूक खर्च विषयक लेखे सादर न केल्याने त्यांना नोटीस देण्याच्या सूचना श्री. सिंग यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अनुप खांडे यांना दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित उमेदवारांना नोटीस देवून ४८ तासांत खुलासा सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
प्रथम तपासणीसाठी निवडणूक खर्च विषयक लेखे सादर न करणाऱ्या उमेदवारांमध्ये माणिक महादेव पावडे (संभाजी ब्रिगेड पार्टी), आदेश रामभाऊ गवई (बहुजन मुक्ती पार्टी), करीम सत्तार शेख (राष्ट्रीय ओलमा कौन्सिल), दिंगबर नरेंद्र चव्हाण (अपक्ष) यांचा समावेश आहे. या चारही उमेदवारांना लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ नियम ७७ च्या तरतुदीनुसार ४८ तासांत खुलासा सादर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी श्री. खांडे यांनी नोटीस बजाविली आहे.




