- मतदानादिवशी होणार ‘वेब कास्टिंग’
वाशिम, दि. १३ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानादिवशी जिल्ह्यातील १०५ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे ‘वेब कास्टिंग‘ होणार आहे. या सर्व मतदान केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’द्वारे निवडणूक यंत्रणेची नजर राहणार आहे. येथील निवडणूक प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून थेट पाहता येणार आहे.जिल्ह्यातील ३३ रिसोड, ३४ वाशिम आणि ३५ कारंजा या तिन्ही विधानसभा मतदारसंघात २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक विधानसभा मतदार संघातील एकूण मतदान केंद्रांच्या दहा टक्के केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्याचे नियोजन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे.
रिसोड विधानसभा मतदारसंघातील ३३, वाशिम मतदारसंघातील ३७ आणि कारंजा विधानसभा मतदारसंघातील ३५ अशी एकूण १०५ मतदान केंद्रांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. याकरिता निवडणूक आयोगाने निश्चित केलेले निकष लावण्यात आले आहेत. एकाच इमारतीमध्ये जास्त मतदान केंद्र असल्यास त्या शाळेतील एक मतदान केंद्र, मागील निवडणुकीत ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मतदान झालेले मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, अशा विविध मतदान केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. वेब कास्टिंगसाठी निवडण्यात आलेल्या मतदान केंद्रामध्ये मतदारांच्या मतदान गोपनियतेचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वीपासून ते मतदान संपेपर्यंतच्या सर्व घडामोडींचे चित्रीकरण होणार आहे.





