वाशिम, दि. १४ : भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ नोव्हेंबर २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी करण्याच्या कार्यक्रम घोषित केला आहे. विभागीय आयुक्त हे शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे त्या-त्या जिल्ह्यासाठी काम करतील. भारत निवडणूक आयोगाने शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.
मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (३) अन्वये जाहिर सुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार, १ ऑक्टोंबर २०१९, मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (४) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी मंगळवार, १५ ऑक्टोबर २०१९, मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (४) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी शुक्रवार, २५ ऑक्टोबर २०१९, नमुना १९ द्वारे दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम दिनांक बुधवार, ६ नोव्हेंबर २०१९, हस्तलिखीत तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई दिनांक मंगळवार, १९ नोव्हेंबर २०१९, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दिनांक शनिवार, २३ नोव्हेंबर २०१९, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी शनिवार, २३ नोव्हेंबर २०१९ ते सोमवार, ९ डिसेंबर २०१९, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे छपाई करणे गुरुवार, २६ डिसेंबर २०१९ आणि मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी सोमवार, ३० डिसेंबर २०१९ रोजी करण्यात येईल.
अमरावती विभागातील सर्व तहसिलदार यांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र शिक्षकांना विहीत नमुन्यात मतदार नोंदणी करावी. सदर मतदार यादी नव्याने तयार होत असल्यामुळे सर्व पात्र शिक्षकांनी मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याकरीता त्यांनी स्थानिक तहसिल/उपविभागीय अधिकारी / जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपली मतदार नोंदणी, त्यांचे कार्यक्षेत्रातील तहसिल कार्यालयात दिनांक १ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत करावी, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी, वाशिम यांचेवतीने करण्यात आले आहे.




