Ø निवडणूक निरिक्षक राजेश सिंग राणा यांची प्रशिक्षणाला भेट
Ø चार सत्रात सुमारे 2400 अधिकारी, कर्मचारी सहभागी
Ø प्रशिक्षणस्थळी टपाल मतपत्रिका कक्षाची सुविधा
भंडारा, दि 16 :- 21 ऑक्टोबरला मतदान व 24 ऑक्टोबरला मतमोजणी या मतदान प्रक्रियेच्या कामासाठी कार्यरत भंडारा विधानसभा क्षेत्राकरीता सुमारे 2400 अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक निरिक्षक राजेश सिंग राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत व उपविभागीयअधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनात दोन दिवशीय प्रशिक्षण हेमंत सेलीब्रेशन सभागृहात पार पडले. तहसिलदार अक्षय पोयाम यावेळी उपस्थित होते.
राज्यात 21 ऑक्टोबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. त्या अनुषंगाने भंडारा जिल्हयात विधानसभा क्षेत्र तुमसर, भंडारा व साकोली येथे मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता नियुक्त करण्यात आलेल्या बुथनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण दिल्या जात आहे. भंडारा विधानसभा क्षेत्राकरीता 14 व 15 ऑक्टोबरला भंडारा येथील हेमंत सेलीब्रेशन सभागृहात चार सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये बुथनिहाय केंद्राध्यक्ष व तीन अधिकारी असे चार जण या प्रमाणे भंडारा क्षेत्रातील 456 बुथावरील 2124 अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले. पहिल्या दिवशी या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच क्षेत्रीय अधिकारी तसेच दुसऱ्या सत्रात 40 सुक्ष्म निरिक्षक यांचाही सहभाग होता.
दोन दिवस पार पडलेल्या प्रशिक्षणात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी मतदान व मतमोजणी प्रक्रिया जबाबदारीने पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया राबविणे, इव्हीएम योग्यरित्या हाताळणे, मतदान प्रक्रियेबाबत आपली जाबाबदारी, तसेच संपूर्ण मतदान प्रक्रिया राबवितांना अभिरुप मतदान प्रमाणपत्र, मतदान केंद्राध्यक्षांची दैनदिनी, मतदान केंद्राध्यक्षांनी करावयाचे घोषणापत्र, नोंदविलेल्या मतांचा हिशोब, मतदानाची टक्केवारी, मतदान केंद्राध्यक्षांसाठी तपासणी ज्ञापन, परिशिष्ट-57 आदि प्रपत्रांसोबतच अन्य निवडणूक विषयक माहिती प्रशिक्षणादरम्यान देण्यात आली. तसेच निवडणूकीच्या कामाकरीता नियुक्ती करण्यात आलेल्या आधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता प्रशिक्षण स्थळी टपाल मतपत्रिका सुविधा कक्ष उघडण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी तथा पोस्टल बॅलेटचे नोडल अधिकारी अभिमन्यु बोदवड यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना एबीसी लिफाफे, डिक्लेरेशन फार्म, सूचनापत्र व टपाली मतपत्रिका उपलब्ध करण्यात आल्या होत्या. दोन दिवसात अधिकारी कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला.
निवडणूक निरिक्षकांची प्रशिक्षणाला भेट
मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी घेण्यात आलेल्या चार सत्रातील प्रशिक्षणाला पहिल्या दिवशी निवडणूक निरिक्षक राजेश सिंग राणा यांनी भेट दिली. उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ व तहसिलदार पोयाम यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर निवडणूक निरिक्षकांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबत प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी निवडणूक निरिक्षकांच्या प्रश्नांना योग्य उत्तर दिले.




