30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ शहरात मतदानासाठी वॉक फॉर वोट रॅली;निवडणूक निरिक्षक सहभागी

शहरात मतदानासाठी वॉक फॉर वोट रॅली;निवडणूक निरिक्षक सहभागी

0
29

Ø  विद्यार्थी व अधिकारी- कर्मचाऱ्यांना दिली मतदानाची शपथ

Ø  विविध स्लोगनद्वारे मतदानाची जनजागृती

भंडारा, दि 17 :- 21 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या निवडणूकीत तीनही विधानसभा क्षेत्रात शंभर टक्के मतदान व्हावे याकरीता आज भंडारा येथे जिल्हास्तरीय वॉक फॉर वोट रॅलीचे आयोजन करण्यात आले. गांधी चौकातून रॅलीचा शुभारंभ होऊन शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत शिवाजी स्टेडियम येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.  रॅलीत  निवडणूक निरिक्षक राजेश सिंग राणा सहभागी झाले होते.

21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूकीकरीता मतदान होऊ घातले आहे. या निवडणूकीत शंभर टक्के मतदान व्हावे, नागरिक मतदानापासून वंचित राहू नये याकरीता स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हा व विधानसभा क्षेत्रात  मतदानाची व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. आज सकाळी गांधी चौक ते शिवाजी स्टेडियम पर्यंत वॉक फॉर वोट रॅली काढण्यात आली. निवडणूक निरिक्षक राजेश सिंग राणा यांच्या हस्ते गांधी चौकातून रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, स्वीपच्या नोडल अधिकारी मृणालिनी भूत, जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, नगरपरिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांची उपस्थिती होती.

रॅली शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत शिवाजी स्टेडियम येथे पोहचली. त्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. शिवाजी स्टेडियम येथे पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पांचाळ यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व र्विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देवून प्रत्येकाने शंभर टक्के मतदान होईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. रॅली मध्ये नगर परिषद, जिल्हा परिषद व खाजगी शाळातील विद्यार्थी शिक्षक यांच्यासोबतच जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचारी, स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातात स्लोगन घेवून, सर्वांची ही आहे जबाबदारी मत देणार नार आणि नारी, लोकतंत्र की सूनो पुकार मत खोना अपना अधिकार, युवर व्होट इज युवर व्हॉईस यासह विविध संदेशाद्वारे जनजागृती केली.