आमगाव,दि.17ः-ृभारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पध्दतीने कार्य करीत आहे. यातुलनेत काँग्रेसचा इतिहास बघितल्यास हा नेहमीच सर्वसमावेशक मवाळ राहिला आहे. आजघडीला विरोधकांवर मोठया प्रमाणात दबावतंत्राचा वापर होत असला तरी काँग्रेस पक्ष हा गांधींचीच्या विचारसरणीवर असल्याने आम्ही त्याच मार्गाने सत्ताधार्यांना उत्तर देऊ असे मत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी व्यक्त केले.ते १६ ऑक्टोबर रोजी आमगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या प्रचारार्थ आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी प्रामुख्याने मध्यप्रदेशच्या विधानसभा उपाध्यक्ष हिना कावरे, माजी आ. राजेंद्र जैन, जिपचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आघाडीचे सरकार स्थापन नक्कीच होईल, असा विश्वास मुख्यमंती बघेले यांनी व्यक्त केला.पुढे बोलताना बघेल म्हणाले की, आम्ही छत्तीसगडमध्ये धानाला २५00 रुपये क्विंटल भाव दिला. तेथील जनता आमच्यासोबत आहे.आम्ही ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.आमच्या मध्यप्रदेशातील सरकारने सुध्दा न्याय देण्याचा प्रयत्न केला.लोकसंख्येच्या प्रमाणात आम्ही आरक्षण देऊ शकत नसलो तरी मंडल आयोगानुसार 27 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर येथील न्यायव्यवस्थेने त्यावर आक्षेप घेतले यावरुन न्यायव्यवस्था सुद्दा ओबीसींच्या हिताच्या निर्णयावर आम्हाला कुठेतरी आठकाडी निर्माण करीत असल्याची खंत व्यक्त केली.




