39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय राजकुमार बडोलेंना विजयी हॅट्रिकची संधी!

राजकुमार बडोलेंना विजयी हॅट्रिकची संधी!

0
33

blank

अर्जुनी मोरगाव,दि.18 : परिसीमनानंतर २००9 मध्ये हा मतदारसंघ अस्तीत्त्वात आला तेव्हापासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. मागील दहा वर्षांपासून राजकुमार बडोले हेच या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. भाजपने त्यांना पुन्हा यंदा तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे.मतदार त्यांना या संधीचा फायदा घेऊन ते विजयाची हॅट्रीक मिळवून देतात की नवा गडी निवडूण आणतात,याकडे लक्ष लागले आहे. मात्र या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतीलच चित्र कायम राहिल्यास भाजप उमेदवारासाठी ती अनुकुल बाब ठरू शकते.जिल्ह्यातील चारही मतदारसंघाचा विचार केल्यास सर्वात कमी उमेदवार ८ उमेदवार अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी युती आणि आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या पक्षातील बंडखोर उमेदवारांचे मन वळविण्यात यश आले. त्यामुळे बंडखोरी नसलेला हा एकमेव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून भाजप-सेना युतीकडून राजकुमार बडोले तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून मनोहर चंद्रिकापुरे,वंचित बहुजन आघाडीकडून अजय लांजेवार आणि बसपाकडून शिवदास साखरे हे निवडणूक रिंगणात आहे. एकूण आठ उमेदवार जरी निवडणूक रिंगणात असले तरी थेट लढत ही युतीचे राजकुमार बडोले आणि आघाडीचे मनोहर चंद्रिकापुरे यांच्यात होणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले होते. काँग्रेसचे राजेश नंदागवळी यांनी ३४१०६ ही दुसºया क्रमांची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी ३१ हजार ८९३ मते घेतली. भाजपचे राजकुमार बडोले यांनी ६४ हजार ४०१ आणि शिवसेनेच्या किरण कांबळे यांनी १५ हजार ३३६ मते घेतली होती. एकंदरीत युती आणि आघाडी नसल्याने मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले होते. मात्र या वेळी बंडखोरी नसल्याने आणि युती आणि आघाडी झाल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता वाटत नसली तरी काँग्रेसच्या इच्छुकामधील नाराजी आणि प्रचारात नसलेला सहभाग हा आघाडीच्या उमेदवारासाठी तेवढा काही सोपा राहिलेला नाही.तरीही राजकुमार बडोले आणि मनोहर चंद्रिकापुरे यांच्यात थेट लढत होणार आहे. या रंगतदार सामान्यात ज्याचे पारडे जड होईल तो मतदारसंघावर राज्य करेल हे स्पष्ट आहे. राजकुमार बडोले यांनी साडेचार वर्ष सामाजीक न्याय विभागाचे मंत्री म्हणून केलेली कामे आणि पार पाडलेली कामगीरी, मतदारसंघातील मतदारांशी कायम ठेवलेला जनसंपर्क, साधा माणूस ही त्यांची प्रतिमा या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. तर मनोहर चंद्रिकापुरे हे मागील निवडणुकीत पराभूत होऊन सुध्दा मतदारसंघात सक्रीय होते. त्यांनी पाच वर्षाच्या कालावधीत हा मतदारसंघ पिंजून काढला आहे.शिवाय आघाडी झाल्याने मतविभाजनाचा धोका टळला आहे. त्यामुळे या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरु शकतात. या मतदारसंघात २ लाख ५२ हजार ५९१ एकूण मतदार आहेत. जातीय समीकरण पाहता सर्वाधिक ६० टक्के मते ही सर्वसाधारण प्रवर्गातील आहे. वंचित आणि बसपाचे उमेदवार सुध्दा या मतदारसंघात बऱ्यापैकी मते घेऊ शकतात. यावर देखील विजयाचे समीकरण बऱ्याच प्रमाणात अवलंबून असणार आहे. राजकुमार बडोले यांना मतदार हॅट्रीक मारण्याची संधी देतात की मनोहर चंद्रिकापुरे यांना खाते उघडण्याची संधी देतात हे सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

blank