गोंदिया,दि.23ःनगर परिषदेच्या वतीने गोविंदपूर येथे चालविण्यात येणाड्ढया होमियोपॅथी दवाखान्याचे छत शनिवार, १९ ऑक्टोबर रोजी कोसळले. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे नगर पालिकेच्या आपल्या मालमत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्या पुन्हा पुढे आला आहे.
नागरिकांना सुलभतेने व वेळेवर आरोग्यसेवा मिळावी यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात असून मोठा निधी उपलब्ध करण्यात येतो. गोंदिया नगर परिषदेच्या वतीने गोविंदपूर परिसरातील नागरिकांना नि:शुल्क आरोग्यसेवा मिळावी, यासाठी शासकीय टेक्नीकल विद्यालयाजवळ होमियोपॅथी दवाखाना गत अनेक वर्षांपासून सुरू आहे. याचा परिसरातील नागरिक मोठय़ा प्रमाणात लाभ घेतात. मात्र दवाखान्याच्या इमारतीची दुरवस्था झालेली असतानाही नगर पालिकेचे या इमारतीकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, आज १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास या दवाखान्याचे छत कोसळले. यावेळी दवाखान्यात डॉ. शिवांगी पांडे व आरोग्यसेविका ललीता गायधने उपस्थित होत्या. सुदैवाने त्यांना कोणतीही हानी झाली नसली तरी दवाखान्यातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे नगर परिषदेच्या आपल्या मालकीच्या मालमत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे.





