वाशिम, दि. २३ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवार, २४ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ८ वाजलेपासून सुरु होणार आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी वाशिम बसस्थानक जवळील कोरोनेशन क्लब हॉलमध्ये होणार आहे. त्यामुळे वाशिम बसस्थानक ते देशमुख दवाखाना या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले आहेत.
मतमोजणीचे ठिकाण हे वाशिम बसस्थानक ते शासकीय विश्रामगृह रोडवर आहे. मतमोजणीच्या दिवशी या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी व वाहनांची वाहतूक होण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून बसस्थानक ते देशमुख दवाखाना या मार्गावरील वाहतूक २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजलेपासून बसस्थानक ते अकोला नाका ते देशमुख दवाखाना या मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.




