39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ पिक नुकसानीचे पंचनामे ‘मोहिम’ स्वरूपात पूर्ण करावे- पालकमंत्री

पिक नुकसानीचे पंचनामे ‘मोहिम’ स्वरूपात पूर्ण करावे- पालकमंत्री

0
38

* पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात अर्ज सादर करावे

बुलडाणा.दि. 29 : जिल्ह्यात यावर्षी खरीपाचे जोरदार पीक आले. मात्र परतीच्या व मागील दहा दिवसांपासून संततधार पडत असलेल्या पावसामुळे या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मका आदी पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तरी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे यंत्रणांनी मोहिम स्वरूपात पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेत नुकसानीसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन 28 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार ॲड आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ निरूपमा डांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील – भुजबळ, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक श्री. लहाने आदी उपस्थित होते.

विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज तातडीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करीत पालकमंत्री श्री. कुटे म्हणाले, विमा कंपनीने अत्यंत जबाबदारीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. सोयाबीनच्या सुड्या, पेंढ्या अथवा गंजी मारून नुकसान झालेल्या पिकालाही विम्याची मदत द्यावी. पंचनामा करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, विमा कंपनी प्रतिनिधी व कृषि सहाय्यक यांची संयुक्त टीम बनवावी. ज्या गाव शिवारात पंचनामा करण्यासाठी टिम जाईल, तेथील सरपंचाला आधी कळवावे. तसेच विमा कंपनीने प्रत्येक तालुक्यात आपला कर्मचारी कार्यरत ठेवावा. शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारी जाणून त्यांचे तातडीने निरसन करावे.

ते पुढे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी संबंधित पिकाचा विमा काढला आहे, त्यांना पिक विम्याची व एनडीआरएफची मदत अशी दोन्ही मिळणार आहे. तसेच ज्यांनी विमा काढला नाही, त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रबंधनाकडून मिळणारी मदत मिळेल. त्यामुळे कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना परिपूर्ण आर्थिक मदत देण्यात येईल. विमा कंपनी व प्रशासनाने सहकार्याने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत मिळण्याची कार्यवाही पूर्ण करावी. विमा न काढलेल्या पिकांचेही पंचनामे पूर्ण करावे. तसेच लोकप्रतिनिधींसुद्धा आपआपल्या कार्यक्षेत्रात पंचनामे पूर्ण करण्यासाठी लक्ष घालावे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे, त्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जावून आपले अर्ज तातडीने सादर करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.बैठकीला कृषि विभागाचे तालुका कृषि अधिकारी, तांत्रिक अधिकारी व संबंधित यंत्रणांचे कर्मचारी उपस्थित होते.

blank