भंडारा,दि.30: – केंद्र सरकारच्या ईज २.० अन्वये बैंकिंग मधील सुधारणांच्या अंतर्गत भारतीय बैंकिंग संघटनेने ग्राहकाकरीता सार्वजनिक बँकांच्या कामकाजाच्या वेळा आता एकसमान केले आहेत. या कामकाजाच्या वेळेची अमलबजावणी 1 नोव्हेबर पासून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक अशोक कुंभलवार यांनी दिली. भारतीय बँकिंग संघटनेने त्यांच्या ग्राहकांसाठी देशामधील बैंकिंग वेळेचे तीन संच वजा पर्याय केले असून ते आता देशभरात लागू होतील. राज्यस्तरीय बँकर्स समितीने भारतीय बैंकिंग संघटनेचा आदेश आणि जिल्हा बँक व्यवस्थापकांनी प्रत्येक सार्वजनिक बँकेने सुधारित केल्यानुसार जिल्हयातील सार्वजनिक बँकासाठी कामकाजाच्या वेळेचे तीन संच सूचित केले आहेत.
रहिवासी क्षेत्रातील सर्वाजनिक बँकाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ४ अशी आहे. आता ती ग्राहकासाठी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहिल. व्यापारी क्षेत्रातील बँकाची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत आहे. ग्राहकांसाठी ही वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहिल. क्षेत्रीय व इतर कार्यालयाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत आहे. ती आता सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार आहे. आपल्या भंडारा जिल्ह्याकरिता सार्वजनीक क्षेत्रातील बँकेची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आणि ग्राहकांकरीता सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार आहे. बँक व शाखा निहाय कामकाजच्या वेळेचा तपशिल संबंधित बँकाच्या संकेतस्थळावर अवलोकनार्थ उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबत सार्वजनिक बँकेच्या प्रत्येक शाखेस कार्यालयामार्फत सूचना देण्यात येणार आहे. वेळापत्रकानुसार प्रत्येक शाखेने त्यांच्या कामकाजाच्या वेळा सूचना फलकाद्वारे प्रसिध्द कराव्यात. बँकांच्या कामकाजाच्या वेळेची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2019 पासुन लागू करण्यात येणार असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अशोक कुंभलवार यांनी सांगीतले.





