34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणविस यांची निवड

भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणविस यांची निवड

0
37

मुंबई,दि..30ः- राज्यात दिवाळीची धुम पार पाडल्यानंतर सरकार स्थापनेसाठी वेग आला आहे. आज (ता.३०) भारतीय जनता पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. औपचारिकपणे विधिमंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नेता निवडीचा प्रस्ताव आणला. त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राधाकृष्ण विखे-पाटील, हरिभाऊ बागडे, सुधीर मुनगंटीवार, शिवेंद्रराजे भोसले, देवयानी फरांदे, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशीष शेलार, संजय कुटे, गणेश नाईक आमदारांनी अनुमोदन दिले.या सर्व प्रक्रियेला भाजपचे केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना निरीक्षक म्हणून उपस्थित होते.

यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडताना दोन विशेष बाबींचा उल्लेख केला. यामध्ये राज्यात गेल्या पाच वर्षात कोणताही गोळीबार झाला नाही तसेच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणीही केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली नाही याचा समावेश होता.औपचारिकपणे नेता निवडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. त्यांनी यावेळी महायुतीचे सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात न झालेली कामे आगामी काळात करू असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महायुतीमधील नेत्यांचे आभार मानले.पुढची पाच वर्षं सरकार स्थिर राहणार आहे. प्रत्येक समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 5 वर्षांपेक्षा आता जास्त चांगलं काम करायचे आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे. संविधानाच्या अनुरूप राज्य चालवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीची आज बैठक

दरम्यान, संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, या बैठकीत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेत्याची निवड होणार आहे. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून, बैठकीत विधिमंडळ नेत्याची निवड करण्याचे सर्व अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवले जाणार आहेत. त्यानंतर शरद पवार विधिमंडळ नेत्याच्या नावाची घोषणा करतील. विरोधी पक्षनेता पदासाठी राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांचं नाव चर्चेत आहे. तर विधीमंडळ नेतेपदासाठी अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांची नावं आघाडीवर आहेत.

blank