अर्जुनी मोरगाव,दि.30ः- सौरऊज्रेवरील हातपंपातून लाल रंगाचे ३ महिन्यांपासून दूषित पाणी निघत आहे. ग्रामपंचायत ईटखेडा येथे वारंवार कल्पना देऊनसुद्धा दुर्लक्ष केले. परंतु, अद्यापही हातपंपाची दुरुस्ती झाली नसल्याने ३ किमी दूरवरील ईटखेडा येथून पाण्यासाठी पायपीट करण्याची नामुष्की संभाजीनगर वासीयांवर आली आहे. ग्रामपंचायत ईटखेडा व आरोग्य विभागांप्रती तीव्र संताप व्यक्त करून आमदार मनोहर चंद्रिकापुरेंनी याकडे लक्ष देण्याची मागणी याप्रसंगी संभाजीनगरवासीयांनी केली आहे.
ईटखेडा ग्रामपंचायत अंतर्गत संभाजीनगर हे राज्य मार्गालगत बसलेले आहे. गावातील संपूर्ण लोक मजूर वर्गातील आहेत. पिण्याच्या पाण्यायोग्य एक हातपंप असून ते ७ वर्षांपूर्वीपासून कार्यरत आहे. हातपंप तसेच त्यावरील सौरऊर्जा उपकरण, बॅटरीची देखभाल होत नाही. मागील ३ महिन्यांपासून बोअरवेलमधून लाल रंगाचे गढूळ पाणी निघत असल्याने तेथील जनेला उलटी, शौच, डोकेदु:खी व इतर आजारांनी ग्रासले आहे. मजुरीवर निर्भर असलेल्या संभाजीनगर वासीयांना ३ किमी दूरवरील ईटखेडा येथून लेकराबाळांसह रात्री उपरात्री पाण्ी न्यावे लागते. ईटखेडा ग्रामपचांयतनी अद्याप दखल घेतली नसल्याने ग्रामपंचायत कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसते. ऐवढेच नव्हे तर उन्हाळय़ात तलाव-बोळी खोलीकरणात निघालेले मुरमाची परस्पर विल्हेवाट लावून एकही ट्रीप मुरूम रस्त्यावर टाकली नसल्याने पावसाळय़ात संभाजीनगर येथे जाणे शक्य नव्हते. मग्रारोहयो अंतर्गत झालेल्या रस्त्यावर हजारो ट्रीप मुरूमापैकी एकही ट्रीप मुरूम टाकले नसल्याने तीव्र संताप ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
जंगलव्याप्त परिसरातील ग्रामस्थ लोकप्रतिनिधीबद्दल व्यथा मांडतांना म्हणाले की, जंगली श्वापद, अस्वल, बिबट्याचा नेहमीच वावर होत असून अस्वलाच्या हल्ल्यात जीवसुद्धा गमवावा लागला. आता आमची दखल आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी घ्यावी, अशी मागणी ईटखेडाचे माजी सरपंच उद्धव मेहंदळे, सर्वेश धांडे, संजय राऊत, निलेश भांडारकर, दादाजी कोरडे, अशोक सोनवाने, दयाराम राऊत, नंदू राऊत, रवी सोंदरकर आदींनी केली आहे.




