भंडारा,दि.02ः-जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे. सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तसा अहवाल शासनास सादर करावा, तसेच पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकार्यांना निर्देश देण्यात यावे, अशी सूचना खा. सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकारी भंडारा तसेच जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याशी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंबंधी झालेल्या चर्चेत केली आहे.
दरम्यान, आगामी सोमवारपर्यंत यासंबंधी कार्यवाही पूर्ण करून संबंधित अहवाल शासनाला सादर करण्याचे आश्वासन जिल्ह्याधिकारी भंडारा व गोंदिया यांनी दिले असल्याचे खा. मेंढे म्हणाले. तसेच दरवर्षीच्या तुलनेत यंदा धानाची अपेक्षित वाढ लक्षात घेवून जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र वाढीव प्रमाणात तसेच लवकरात लवकर सुरु करावे, अशी मागणी देखील यादरम्यान केली असल्याचे खासदार मेंढे यांनी नमूद केले.





