सडक अर्जुनी ,दि.02ः-: तालुक्यातील डव्वा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील असलेली १0८ क्रमाकांची रुग्णवाहिका दहा दिवसांपासून बिघाडामुळे गॅरेजमध्ये पडून आहे. त्यामुळे अपघातग्रस्त व अन्य रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळणे कठीण झाले आहे. प्रशासनाने ताबडतोब ही सेवा सुरू करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.
वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्यामुळे रूगण दगावण्याची शक्यतता आहे. हे अलीकडेच झालेल्या अपघातातून स्पष्ट झाले. खरी येथे झालेल्या अपघातात तीन रुग्णांना प्राण गमवावा लागला होता. तसेच पळसगाव येथे झालेल्या अपघातात जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी तब्बल दोन तासांनी सडक अर्जुनी रुग्णालयाची १0८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध झाली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे असलेली रुग्णवाहिका सेवा अपुरी पडत असल्यामुळे शासनाने आरोग्य विभागामार्फत १0८ रुग्णवाहिका सेवा सुरू केली. आपातकालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने १0८ मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. अपघात, हृदयविकार, विषबाधा, सर्पदंश, आगीच्या दुर्घटना यातील रुग्णांना रुग्णालयात त्वरित उपचार मिळावा, यासाठी १0८ या क्रमांकवर फोन केल्यास काही वेळात रुग्णवाहिका उपलब्ध होते. परंतु, डव्वा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत असलेली १0८ रुग्णवाहिका नादुरूस्त असल्यामुळे आपातकालीन परिस्थितीत रुग्णांना, अपघातातील जखमींना वेळेवर औषधोपचार मिळणे कठीण झाले आहे. यामुळे रुग्ण दगावण्याची शकयता आहे. दरम्यान प्रशासनाने ताबडतोब ही सेवा सुरू करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.





