33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ पीक नुकसानीचा कृषी विभाग व विमा कंपनीने संयुक्त सर्व्हे करावा – पालकमंत्री...

पीक नुकसानीचा कृषी विभाग व विमा कंपनीने संयुक्त सर्व्हे करावा – पालकमंत्री डॉ परिणय फुके

0
40

blank

• जिल्ह्यात अंदाजित 8080 हेक्टर क्षेत्र बाधित
• 2683 बाधित शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे
• नुकसानीबाबत आढावा सभा
• पंचनामे युद्धस्तरावर करा

भंडारा दि. 03 :- जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे कृषी विभाग व विमा कंपनीने संयुक्त सर्व्हे करून बाधित झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यास पीक विम्याचा लाभ देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या धान पीक नुकसानीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पिक निहाय भरपाई निश्चित करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.
अवकाळी पाऊसामुळे भंडारा जिल्हयातीत धान पिकाच्या नुकसानीबाबत आज जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थीतीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा घेण्यात आला.
या बैठकीला पालकमंत्री डॉ. परिणय फुके, खासदार सुनिल मेंढे, आमदार राजुभाऊ कारेमोरे, माजी आमदार बाळा काशीवार, अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, भंडारा येथील उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची व पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेतली. कृषी विभागाने व विमा कंपनीने गावो-गावी जाऊन शेताचा सर्व्हे करून पिकाच्या नुकसानीची पाहाणी करावी व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच नुकसान झालेला शेतकरी विम्यापासुन वंचीत राहता कामा नये असे पालकमंत्री यांनी सांगीतले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी पिक विका काढलेल्या शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची माहिती पालकमंत्री यांनां दिली. भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी व लाखांदुर या सात तालुक्यातील गावामधुन 1167 शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्यासाठी अर्ज आले असून प्राप्त अर्जांपैकी 479 अर्जांचे पंचनामे करण्यात आलेले आहेत अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली.
जिल्ह्यात अंदाजे 8080 हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले असून 2683 बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. बाधित शेतकऱ्यांकडून अर्ज घेण्याचे व पंचनामे करण्याचे काम सुरू असून हा आकडा वाढू शकतो असे ते म्हणाले.
पालकमंत्री म्हणाले की, यावर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्लॉनसह चार वादळांचा फटका बसला. या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अधिक होती. त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकऱ्यांची समस्या ऐकून घ्यावी. यासाठी व्हॉटसअॅतप क्रमांक सुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत. धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकं यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
याशिवाय जिथे कुठे यंत्रणा पोहचली नसेल अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर फोटो अपलोड केल्यास, ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत. नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पिक निहाय भरपाई निश्चित करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री डॉ. फुके यांनी यावेळी दिली.

blank