गोंदिया,दि.03ः-जिल्हयातील सालेकसा पोलीस ठाणेतंर्गत येत असलेल्या परिसरातून तीन संशयीत नक्षलवांद्यांना सालेकसा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली असून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी दिली असून चौकशी झाल्यानतंरच सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.
गोंदिया जिल्हयातील सालेकसा तालुका हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. विशेषतः छत्तीसगड राज्याची सीमा लागून असल्यामुळे या भागात वेळोवेळी नक्षल्यांचा हालचाली असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे मागील महिण्यात 17 आॅक्टोंबर रोजी देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथे मडावी नामक व्यक्तीच्या घरातून स्फोटके ,21 जीवंत डिटोनेटर मिळून आले होते तसेच चार दिवसानंतर विधानसभा मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलिस खब-या असल्याच्या संशयावरून काही नक्षलवाद्यांनी मुरकुटडोह या जंगल परिसरात भालचंद्र धुर्वे वय 50 वर्ष रा.मुरकुटडोह याची गोळी झाडून हत्या केली होती. या प्रकरणी सालेकसा पोलिस ठाणेअंतर्गत 10 नक्षलवाद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत नक्षलींवर त्या दृष्टीकोणातून पाहिले जात आहे.ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे,ते गावकरी असल्याचे आणि नक्षल मोहिमेशी संबध नसल्याचे गावकरी म्हणत असल्याचेही वृत्त आहे.





