
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.4: सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलते यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची गरज आहे आणि ते बनेल त्यासाठी आम्ही पूर्ण आश्वस्त आहोत, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज दिल्लीत असून तेथे महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, ‘राज्यात ३२५ तालुक्यात शेतीचं नुकसान झालेलं आहे. अनेक गावांत शेतीचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची आवश्यकता आहे. यासंदर्भातल्या केंद्र सरकारच्या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री असतात. त्यामुळे मी अमित शहांची भेट घेतली.”शेतीचे किती नुकसान झाले आहे, याचा संपूर्ण डिटेल असेसमेंट मी शहा यांच्यासमोर ठेवला आहे. यानंतर आवश्यक त्या मदतीसाठी ते नक्कीच पावले उचलतील. यासंदर्भातील एक दुष्काळ पाहणी पथकही महाराष्ट्रात येईल. शहा यांनी विविध सचिवांना माझ्यासमोर आमच्या बैठकीदरम्यान यासंदर्भात आदेश दिले,’ असेही फडणवीस यांनी सांगितले.सरकारस्थापनेबाबत कोण काय बोलते याला महत्व नाही,परंतु सरकार लवकर स्थापन होईल असे म्हणाले.





