गोंदिया, दि. ०9 : मागील १० वर्षांपासून मध्यभारतातील सर्वात मोठे कृषी संमेलन व विदर्भातील कृषी विस्तार उपक्रम असा अॅग्रो व्हिजनचा प्रवास आहे. अॅग्रो व्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी त्यांना आधुनिक पध्दतीने शेती करण्याचे फायदे, नव्या पध्दती, नवे तंत्रज्ञान, शेतीचे यांत्रिकीकरण, जोडधंदे, नव्या बि-बियाणांची माहिती या कृषी संमेलनातून दिली जाते. नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर २२ नोव्हेंबर रोजी या चार दिवसीय कृषी संमेलनाचा शुभारंभ होत असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूरचे माजी जिप अध्यक्ष रमेश मानकर यांनी केले.
ते भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते. भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत प्रामुख्याने प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाणे, जिप उपाध्यक्ष अलताफ हमीद, सभापती विश्वजीत डोंगरे, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, नगरसेवक दिनेश दादरीवाल, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुळकर्णी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, जिल्हा उपाध्यक्ष दीपक कदम, अर्जुनी मोर पंस सभापती अरविंद शिवणकर, दिलीप चौधरी, शहर अध्यक्ष सुनील केलनका, राजेश चतूर, भाऊराव कठाणे, डॉ.लक्ष्मण भगत, परसराम फुंडे, धनेंद्र अटरे, उमाकांत हारोडे, छाया दसरे, अशोके हरिणखेडे, अशोक चौधरी, संजय टेंभरे, राकेश ठाकूर, राकेश शेंडे, मुकेश चन्ने, अशोक जयसिंघानी, गोल्डी गावंडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मानकर म्हणाले, अग्रो व्हिजनमध्ये कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद असा हा कार्यक्रम आहे. यात मोठ्या संख्येत उत्पादक, वितरक, संशोधन संस्था, कृषी विपणन मंडळे, विम्या कंपन्या, यंत्रे व अवजारे, केंद्र व राज्य सरकारचे विविध विभाग अशा ४०० पेक्षा जास्त संस्थांचा सहभाग असणार आहे. २८ पेक्षा जास्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. एमएसएमईच्या सहकार्याने कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग व डेअरी उद्योगाचा विकास व दुग्ध प्रक्रिया यावर एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आले आहे. भारतातील विविध राज्यातील लाखो शेतकरी या प्रदर्शनीला भेट देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाध्यक्ष पटले यांनी आपल्या मार्गदर्शनातून या कृषी प्रदर्शनीचे प्रचार व प्रसार आपल्या मंडळ स्तरावर अधिकाधिक करुन शेतकऱ्यांना सहभागी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आगामी संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले. संचालन जयंत शुक्ला यांनी केले. तर आभार दीपक कदम यांनी मानले.





