28.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ सुन्हेरसिंह ताराम हे ‘गोंडवाना रत्न’ होते -भरतलाल कोराम

सुन्हेरसिंह ताराम हे ‘गोंडवाना रत्न’ होते -भरतलाल कोराम

0
50

सालेकसा,दि.10 : एका इंग्लिश लेखकाचे द स्टोरी ऑफ गोंडवाना हे पुस्तक आम्हा समविचारी संशोधक वृत्तीच्या तत्कालीन पाच युवा मित्रांच्या हाती लागले नसते तर आदिवासींचे पवित्र स्थळ कचारगड हे कदाचित जगाला कळले नसते. या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन पाच मित्रांचे खोजी दल ४0 वर्षांपूर्वी धनेगावला आले. सतत येत राहिले आणि गुंफेचा शोध घेतला. त्यावेळी आजच्या सारखे रस्ते नव्हते. पायवाट सुद्धा नव्हती. सुन्हेरसिंह ताराम यांनी तर कचारगड आणि आदिवासींमध्ये चेतना निर्माण करण्यासाठी आपले आयुष्य अर्पण करून ते येथेच लिंगोवासी झाले. त्यांच्यातील असा जुणून, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि उदार अंत:करण यामुळेच ते ‘गोंडवाना रत्न’ सन्मानाचे मानकरी ठरले असे उद्गार राजनांदगाव (छ.ग.) येथील ज्येष्ठ गोंडी साहित्यिक भरतलाल कोराम यांनी काढले.
धनेगाव(कचारगड) येथे आदिवासी भाषा संशोधन केंद्रात ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.00 वाजता विचारवंत साहित्यिक गोंडवाना दर्शन या हिंदी मासिकाचे संपादक सुन्हेरसिंह ताराम यांच्या प्रथम स्मृतिदिन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य,साहित्यिक लखनसिंह कटरे यांनी उपस्थित अतिथींसह तारामजींच्या समाधीवर पुष्पहार व आदिवासींचे धर्मगुरू पारी कुपार लिंगो यांच्या प्रतिमेपुढे दीपप्रज्‍जवलन करून गोंडवाना दर्शन-साहित्य सरिता चर्चासत्राचे उदघाटन झाल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते माजी प्राचार्य माणिक गेडाम यांनी गोंडवाना दर्शनचे संपादक व पत्रकार सुन्हेरसिंह ताराम या संदर्भात बोलतांना अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा समाजशील, चिंतनशील, कणखर बाण्याचा विनयशील माणूस असा उल्लेख केला. ज्येष्ठ समाजसेविका तथा महिला प्रदेश अध्यक्ष (म.प्र.) हिरासनबाई उईके यांनी तारामजींनी ठिकठिकाणी घेतलेल्या १८ साहित्य संमेलनांची माहिती दिली. या मागील त्यांची सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक भूमिका काय असावी याचा शोध युवा पिढीने घ्यावा, असे आवाहन केले. वर्धा येथील लेखिका प्रा.रेखाताई जुमनाके यांनी गोंडवाना दर्शन या मासिकाचा प्रचार-प्रसार १४ राज्यात कसा केला, कार्यकर्त्यांना, कवी-लेखकांना कसे जोडले व लिहिते केले याबद्दल माहिती दिली. तर रमाताई टेकम, बालाघाट (म.प्र.) यांनी तारामजी हे आदिवासी जनजीवनाचे प्रभावी भाष्यकार होते असा उल्लेख केला.
सुप्रसिद्ध लेखिका व आदिवासी भाषा संशोधन केंद्राच्या संचालिका तथा लिंगोवासी सुन्हेरसिंह ताराम यांच्या अर्धांगिणी उषाकिरण आत्राम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना कचारगडच्या खोजी दलाची माहिती दिली. या पाचपैकी केशवजी मरसकोल्हे, आचार्य मोतीरावण कंगाली आणि सुन्हेरसिंह ताराम हे लिंगोवासी झाले आहेत. गोंडवानाचे सरसेनापती अशी ओळख असलेले नागपूरचे शीतल जी मरकाम हयात आहेत. तसेच राजनांदगावचे ज्येष्ठ गोंडी साहित्यिक भरतलालजी कोराम हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत असे सांगताना आनंद व्यक्त केला. संचालन युवा कार्यकर्ते संतोष कुंजम व गोंडवाना दर्शनच्या सहसंपादिका शताली शेडमाके यांनी आभार मानले. या प्रसंगी धनेगावचे उपसरपंच बारेलाल वरकडे, प.स.चे माजी सभापती दामोदर नेवारे, कवीश्री रमेश शर्मा, शशी तिवारी,मनोज बोरकर, छगन पंचे, युवराज गंगाराम, बापू इलमकर, प्रा. इंद्रकला बोपचे, प्रकाश सलाम, अमित आदी मान्यवर उपस्थित होते