मुंबई,दि.23 :महाराष्ट्रात अजित पवारांच्या पाठिंब्याने झालेल्या भाजप सरकार स्थापनेवर मलाही आश्चर्य झाला असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रामाणिक आमदार आणि सदस्य या सरकारमध्ये जाणार नाहीत. तरीही ते जाणार असतील तर देशात पक्षांतरबंदी कायदा आहे. त्याअंतर्गत त्यांची सदस्यता जाणार याची शक्यता नाकारता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या विरोधात आहे. तरीही त्यास झुगारून आमचे काही आमदार भाजपला पाठिंबा देत असतील तर आम्ही काय, त्यांना जनता देखील माफ करणार नाही असे पवार यांनी सांगितले आहे १० ते ११ सदस्य त्यांच्यासोबत गेल्याचे समजत आहे. जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात आम्ही तीन पक्ष काय करायचं ते करु असेही पवार यांनी सांगितले.पत्रपरिषदेला शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे,आदित्य ठाकरे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील,खा.सुप्रिया सुळे,खा.संजय राऊत,दिलीप वळसे पाटील,जितेंद्र आव्हाड,विद्या चव्हाण,नवाब मलिक,खा.प्रफुल पटेल,प्रा.जोगेंंद्र कवाडे आदी नेते उपस्थित होते.
.महाराष्ट्रात सक्षम सरकार बनावं यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. बहुमताचा आकडा तिन्ही पक्षांकडे होता. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ अशी संख्या होती. शिवसेनेला काही अपक्षांनीही साथ दिली होती. १७० च्या आसपास आमची आमदारसंख्या जात होती. काल आमची बैठक पार पडली. या बैठकीत काही प्रश्नांबाबत चर्चा राहिली होती. मात्र सकाळी आम्हाला राजभवनावर राज्यपालांकडे आणण्यात आले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काही सदस्य तिथे गेल्याचंही समजले. मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवारांनी घेतली. अजित पवारांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधातला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
आम्हाला राजभवनावर नेले, पण का नेले याची कल्पना नव्हती -राष्ट्रवादी आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे काही आमदार देखील आणले आणि त्यांना बोलण्याची संधी दिली. यामध्ये एकानंतर एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी सकाळी झालेल्या घटनाक्रमाची माहिती दिली.त्यामध्ये बुलडाण्याचे राजेंद्र शिंगणे,संजीव क्षिरसागर यांचा समावेश हातो. आम्हाला सर्वांना राजभवनावर शनिवारी सकाळी नेण्यात आले. का नेले जात आहे याची काहीच माहिती दिली नाही. यानंतर शपथविधी झाला तेव्हा संपूर्ण प्रकार लक्षात आला असा दावा या आमदारांनी केला आहे.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बोलावले त्यानंतर आम्हाला राजभवन येथे घेऊन गेले.तेव्हा तिथे फडणवीस,चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन पोचले आणि राज्यपाल येताच शपथविधी सुरु झाल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीच्या आमदारांनी हजेरीपत्रावर केलेल्या सह्यांचा वापर सत्तास्थापनेसाठी केल्याचा आरोप अजित पवारांवर केला आहे. यामुळे अजित पवारांनी बंडखोरी केल्याने त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी भावूक होत व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवले आहेत. एकीकडे शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी भाजपाशीही बोलणी सुरू ठेवली होती. तर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचीही अजित पवारांच्या बंडाला साथ असल्याचे समजते आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधिमंडळाचे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यामुळे त्यांना आमदारांना मतदान करण्यासाठी व्हीप काढण्याचा अधिकार आहे. यामुळे ते तातडीने व्हीपही बजावू शकतात. तसेच त्यांना गटनेतेपदावरून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना बैठक घेऊन तसे पत्र विधानसभाध्यक्षांना द्यावे लागणार आहे. हे झाल्यानंतरच अजित पवार यांचे अधिकार संपुष्टात येतील.तसेच विधानसभा अध्यक्ष निवड ही गुप्त मतदानाद्वारे घेतली जाते. यामुळे येत्या 3-4 दिवसांत तीन दिवसीय विधिमंडळ अधिवेशन बोलावले जाईल. यामध्ये विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल. यामुळे राष्ट्रवादीचे आमदार कोणाला मतदान करतात हे कळणार नाही. तसेच शिवसेनेचा एक गट फुटल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.





