24.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home राजकीय सभापती-उपसभापतींवर संचालकांचा अविश्वास;कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप !

सभापती-उपसभापतींवर संचालकांचा अविश्वास;कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप !

0
6

गोंदियाः सत्ता बदलापासून गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचा अनागोंदी कारभार कायम चर्चेत राहिला आहे. त्यातच आता सभापती व उपसभापतीच्या कामकाजाला घेवून नाराज असलेल्या संचालकांनी अविश्वासचा एल्गार पुकारला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून विद्यमान सभापती भाऊराव उके व उपसभापती राजकुमार उर्फ पप्पू पटले यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. संचालक मंडळातील १८ पैकी तब्बल १३ संचालकांनी त्यांच्याविरुद्ध बंड पुकारले असून अविश्वास ठरावाच पत्र (ता. ६) जिल्हाधिकारी मंदार पत्की यांना सोपविण्यात आले. त्यामुळे कृउबासतील अनागोंदी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
अडीच वर्षापूर्वी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी सत्तापालट केले. दरम्यान भाजप तथा चाबी संघटनाच्या हाती सत्ता सोपविण्यात आली. कॉंग्रेस व भाजपच्या संचालकांनी सत्ता काबीज केली. मागील अडीच वर्षाचा कार्यकाळ भ्रष्टाचाराने चांगलाच गाजला. सभापती भाऊराव उके यांच्याविरूध्द लाचलुचपत विभागाने कारवाई करून आरोपाच्या कटघरात उभे केले. हा सर्व प्रकार लक्षात घेवून सभापती भाऊराव उके यांनी पदाचा राजीनामा देवून दुसऱ्या संचालकाला संधी द्यावी, असे मत भाजप गटातील संचालकाकडून सातत्याने व्यक्त करण्यात आले. परंतु, सभापती राजीनामा देण्याच्या मानसिकतेत नसल्याने पेच निर्माण झाला. तर दुसरीकडे सभापती भाऊराव उके
व उपसभापती पप्पू पटले हे बाजार समितीचा कारभार आपल्या मनमर्जीप्रमाणे हाकतात. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयामध्ये ते संचालक मंडळाला विश्वासात घेत नाहीत, असा आरोप करीत संचालकांमध्ये असंतोष खदखदत होता. या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी मागच्या मासिक बैठकीतच या १३ संचालकांनी एकत्र येत बहुमताने एक महत्त्वपूर्ण ठराव पारित केला होता. या ठरावाद्वारे सभापती व उपसभापती यांचे सर्व आर्थिक तसेच प्रशासकीय अधिकार काढून घेत, त्यांना कोणतेही प्रशासकीय व आर्थिक निर्णय घेण्यास बंदी घालण्यात आली होती. असे असूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अखेर या संचालकांनी थेट अविश्वास ठराव मांडण्याचे अंतिम पाऊल उचलले आहे.
अविश्वास ठरावाच्या नोटीसवर १३ संचालकांनी आपल्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये धनंजय देवभाऊ तुरकर, मुकेश जमन्लाथ रंगटाले, राजीव रूपचंद ठाकरे, ओमेश्वर सुखदेव चौधरी, चेतनकुमार भैयाभाऊ बत्रेकर, राधाकृष्ण नारायण ठाकूर, सौ. कौशल छत्रपाल तुरकर, सौ. श्यामकला जिकलाल पांडे, मुरलीधर भोजराज नागपुरे, अरुण नामदेवराव गजभिये, धनलाल बालचंद ठाकरे, पंकज सुंदरलाल यादव आणि विजय नारायण उके यांचा समावेश आहे. या निवेदनाची प्रत माहिती वपुढील कारवाईसाठी पणन संचालक (पुणे), विभागीय सहनिबंधक (नागपूर) आणि उपजिल्हा निबंधक (गोंदिया) यांनाही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे कृउबासच्या राजकारण पेटले असून आगामी काळात होणाऱ्या हालचालींकडे लक्ष लागले आहे