28.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ सातव्या आर्थिक गणनेस आज सुरुवात

सातव्या आर्थिक गणनेस आज सुरुवात

0
35

Ø  जिल्हाधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून केला रॅलीचा शुभारंभ

भंडारा( जिमाका ), दि,26:- केंद्र सरकारला विविध योजनांसाठी आवश्यक असणारी माहिती पुरविण्यासाठी केंद्रीय सांख्यिकी विभागाकडून सातव्या आर्थिक गणनेस आज सुरुवात झाली. सातव्या आर्थिक गणनेच्या प्रचार व प्रसिध्दी रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, जिल्हा सांख्यिकी अधिकारी शितल अस्वले, कॉमन सर्व्हिस सेंटरचे पर्यवेक्षक आणि प्रगणक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी नागरिकांनी कॉमन सर्व्हिस सेंटरच्या नियुक्त केलेल्या प्रगणकांना माहिती उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले.

केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत सातवी आर्थिक गणना घेतली जात आहे. ही गणना सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय व सीएससी ई-गव्हर्नन्स सव्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाणार आहे. सातव्या आर्थिक गणनेमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी कुटूंबास, उद्योगास भेट देवून करण्यात येणार आहे. आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम कॉमन सर्व्हिसेस सेटर ई-गव्हर्नस यांचे कडून नेमण्यात आलेल्या प्रगणकांकडून केले जाणार आहे.

महाराष्ट्रात सातव्या आर्थिक गणना 26 नोव्हेंबर 2019 पासून माहिती संकलन करण्यात येत असून पुढील तीन महिने चालणार आहे. जनतेच्या हितासाठी चांगली धोरणे आखता यावी, नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजा ओळखून त्यांना हव्या तशा योजना सुरु करता याव्यात, या करीता आर्थिक गणना हाती घेण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक प्रत्येक घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील, असे जिल्हाधिकारी प्रदीपचंद्रन व ‍जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांनी सांगितले.आर्थिक जनगणनेत घरगुती उपक्रमांसह शेती व बिगर शेती क्षेत्रातील वस्तु, सेवा (स्वत:च्या वापराच्या एकमात्र उद्देशाव्यतिरिक्त ) उत्पादन किंवा  वितरणात गुंतलेल्या सर्व आस्थापनाचा समावेश असेल. ही गणना पेपरलेस असून यासाठी मोबाईल टॅबचा वापर करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात आतापर्यंत 6 आर्थिक गणना घेण्यात आल्या आहेत. पहिल्या आर्थिक गणना 1977 मध्ये, दुसरी 1980 मध्ये, तिसरी 1990 मध्ये, चौथी 1998 मध्ये पाचवी 2005 मध्ये व सहावी आर्थिक गणना 2013 मध्ये घेण्यात आली.

सहावी आर्थिक गणनेनुसार महाराष्ट्रात एकूण 61.37 लक्ष आस्थापना कार्यरत होत्या. त्यापैकी 32.94 लक्ष आस्थापना ग्रामीण भागात तर 28.43 लक्ष आस्थापना शहरी भागात असल्याचे आढळून आले. महाराष्ट्रात एकूण रोजगार निर्मितीची संख्या 145.12 लक्ष एवढी आढळून आली व यापैकी 41.77 टक्के ग्रामीण भागात तर 58.23 टक्के शहरी भागात रोजगार निर्मिती झाल्याचे आढळून आले. उत्पादन क्षेत्रात सर्वाधिक 29.18 लक्ष रोजगार निर्मिती होती. त्याखालोखाल किरकोळ व्यापार क्षेत्रात 26.73 लक्ष तर पशुधन क्षेत्रात 24.11 लक्ष एवढी रोजगार निर्मिती नोंदविली आहे.