जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सभा
वाशिम, दि. 27 : जिल्ह्यातून राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा मार्ग जातात. जिल्ह्यात रस्ता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येकाने वाहतूकीचे नियम पाळावे. असे मत अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे यांनी व्यक्त केले.जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची सभा 26 नोव्हेंबर रोजी श्री वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात आयोजित करण्यात आली यावेळी ते बोलत होते. सभेला अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कळमकर, प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती समरीन सय्यद, शिक्षणाधिकारी तानाजी नुरळे, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. बी. एस. हरण, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक बी. आर. राठोड, राज्य महामार्गाचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र चौधरी, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आर. डी. वाटाणे, पोलीस महामार्ग केंद्राचे पोलीस उपनिरिक्षक एन. जी दांदळे यांची उपस्थिती होती.
श्री वानखेडे म्हणाले, जिल्ह्यात ऑक्टोंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे महामार्ग, मार्ग तसेच जिल्हयातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहे. ज्या विभागाकडे जे मार्ग आहेत, त्यांनी खड्डे बुजविण्याची कार्यवाही तातडीने करावी. मालवाहू व प्रवासी वाहनांना अडचणीचा सामना करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे अपघाताला काही प्रमाणात आळा घालण्यास मदत होईल. रस्ते अपघाता संदर्भात समितीने दर महिन्याला आढावा बैठकीचे आयोजन करावे. त्यामुळे रस्ते विषयक समस्या सोडविण्यास मदत होईल. कारंजा येथील झाशी राणी चौक येथे महामार्ग विभागाने वाहतूक चिन्ह दर्शविणारा फलक लावण्याची कार्यवाही करावी. जिल्हयात ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात असे ब्लॅक स्पॉट निश्चित करुन तेथे सुधारणा व आवश्यक त्या उपाययोजना करण्याची कार्यवाही करावी. असे त्यांनी सांगितले.
रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घ्यावा. असे सांगून श्री वानखेडे पुढे म्हणाले, अपघाताने प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकीस्वाराला हेल्मेटचा वापर करणे सक्तीचे केले पाहिजे. चारचाकी वाहन चालकाने चालवितांना सीट बेल्टचा वापर केला पाहिजे. दुचाकीवर दोनच व्यक्तींनी प्रवास करावा. वाहन चालवितांना मोबाईलचा वापर कोणताही वाहन चालक करणार नाही याची दक्षता घेवून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंड वसूलीची कारवाई करावी असे सांगीतले.
वाहतुकीची कोंडी दुर करण्यासाठी वाशिम शहरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी सिग्नल बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी असे सांगून श्री. वानखेडे म्हणाले, जिल्हयात रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळाली पाहिजे यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहीका तातडीने त्या घटनास्थळी पोहचवून अपघातग्रस्तांना मदत केली पाहिजे तसेच शालेय विद्यार्थ्यांची स्कुल बसमधून होणारी वाहतूक ही सुरक्षीत आहे याची खात्री परिवहन विभागाने करावी. पालकांना व स्कुल बस चालकांना सुरक्षिततेबाबत शालेय स्कुल बस समितीची बैठक घेवून अवगत करावे. वाशिम शहरात आवश्यक त्याठिकाणी गतीरोधक बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी. जिथे अवैध गतिरोधक लावण्यात आलेले आहेत ते तातडीने काढण्यात यावे. कारंजा येथील भगतसिंग चौक ते ताज चौक दरम्यान मोठया प्रमाणात वर्दळ राहत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अवैध वाहतूकीला प्रतिबंध करण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावी.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ता अपघाताचे प्रमाण करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना व कार्यवाही बाबतची माहिती श्रीमती सय्यद यांनी दिली. तसेच पोलीस व महामार्ग पोलीस यांच्यावतीने देखील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कळमकर यांनी रस्ता अपघाताला आळा घालण्यासाठी त्यांच्या विभागाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.




