
अन अखेर सिमरन व आई रेखाची झाली भेट
नवेगावबांध पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन
नवेगावबांध.दि.28ः अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी ते येरंडी-देऊळगाव या मार्गावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहंनाना हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न सायकांळी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान 25 नोव्हेंबरला एक तीन वर्षाची अनोळखी मुलगी करीत असल्याचे या मार्गावरुनच प्रवास करणाऱ्या देवरी तालुक्यातील पालांदूर जमीदारी येथील हासिंद्र खुशाल मेश्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या मुलीची विचारपूस केली.विचारपूस करीत असतांना ती काहीही बोलत नसल्याचे लक्षात आले.आणि त्या मुलीला सोबत घेत नवेगावबांध पोलीस ठाण्यात नेले.तिथे मेश्राम यांनी पोलिसांना सर्व माहिती दिली.
पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन जेवण,नाश्ता दिला.नाव, गाव विचारले. परंतु ती काहीही बोलत नव्हती. त्यामुळे ही मुलगी बाराभाटी, येरंडी ,देऊळगाव या गावा दरम्यानच्या राज्यमार्गावर मिळून आल्याने त्याच परिसरातील असावी असा अंदाज व्यक्त करीत तपासाला सुरवात केली.येरंडी, देऊळगाव या ठिकाणी ही चौकशी केली, परंतु भटकलेल्या सिमरनच्या आई-वडिलांचा शोध लागला नाही.शेवटी पोलीस कुंभिटोला बाराभाटी येथे सदर मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी गेले असता कुंभीटोला(बाराभाटी) येथील इंसाराम इंदर नाईक यांच्या घरी मुलाच्या नामकरण विधीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला आलेल्या देवरी तालुक्यातील सिलापूर डवकी येथील रेखा विनोद भोयर या पाहुण्या म्हणून आल्या होत्या.त्यांची ती मुलगी असाव असा अंदाज घेत पोलीस नाईक यांच्या डवकी येथील घरी पोहोचले. सदर मुलगी सिमरण विनोद भोयर (वय-3) हिला तिच्या आईने व नातेवाईकांनी आपलीच सिमरण असल्याचे सांगितल्याने तीची ओळख पटत आईवडीलांच्या स्वाधीन करण्यात आले.
सिमरण ही काही प्रमाणात मतिमंद असल्याने खेळता खेळता भटकली. तिच्या आई व नातेवाईकांनी गावात शोध घेतला.परंतु सिमरनचा काही शोध लागला नाही.त्यातच नवेगावबांध पोलिसांनी सिमरनला सुस्थितीत नातेवाईकांच्या उपस्थितीत आई रेखा हिच्या स्वाधीन केले. भटकलेली सिमरन मिळताच चिंताग्रस्त आई रेखाच्या चेहर्यावर हास्य उमटले.उपस्थित सर्व नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी नवेगावबांध पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुंभरे, पोलीस हवालदार कोडापे, पोलीस शिपाई आनंद रुद्रवाड, पोलीस हवालदार शेख, पोलिस नायक ताराम, सैनिक गुरनुले, चालक पोलीस नायक कोकोडे यांचे अभिनंदन केले.भटकलेल्या मुलगी सिमरन व आई रेखा ची भेट घालून दिल्याबद्दल नवेगावबांध पोलिसांचे परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.




