वृत्तसंस्था/मुंबई,दि.28 नोव्हेंबर- महाराष्ट्राच्या महानाट्यानंतर अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य-दिव्य सोहळ्यात ठाकरे घराण्यातील पहिल्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्या या ऐतिहासिक शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवतीर्थावर एकवटले. यावेळी राज्य आणि देशातील अनेक नेतेमंडळींसह उद्धव ठाकरेंचे बंधू राज ठाकरेंची उपस्थिती लक्षणीय होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे या सर्वांना शपथ दिलीयावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि आई वडिलांना स्मरुन मुख्यमंत्रिपदाची शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतली. तर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांना स्मरुन शपथ घेतली. त्यानंतर सुभाष देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन शपथ घेतली.याशिवाय, राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांना वंदन करून शपथ घेतली. यावेळी जयंत पाटील आपल्या वडिलांसोबत आईचेही नाव घेतले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जय महाराष्ट्र, जय शिवराय, असे म्हणत महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून शरद पवारांच्या आदेशानुसार शपथ घेत असल्याचे सांगितले. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांच्या आशिर्वादाने शपथ घेतली. त्यानंतर नितीन राऊत यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करुन शपथ घेतली.
मुख्यमंत्रिपदाची धुराही स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांनी शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात नवा अध्याय रचला आहे. ज्या शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोप रुजवले आणि वाढवले, त्याच शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई-वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन असे उद्गार संध्याकाळी ६.४०च्या मुहूर्तावर शिवाजी पार्कवरच्या भव्यदिव्य रंगमंचावरून घुमले आणि तमाम शिवसैनिक शहारले, थरारले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याआधी त्यांनी शिवाजी पार्कातीलच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आपल्या वडिलांना वंदन केले. महाराष्ट्राच्या समाजकारणावर आणि राजकारणावर अमीट छाप उमटवणाऱ्या, राज्याचा रिमोट कंट्रोल मानल्या जाणाऱ्या, मात्र सत्तेच्या खुर्चीपासून दूर राहिलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्यातील व्यक्ती थेट राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होत असल्याने आजचा शपथविधी हा शिवसेनेसाठी अनुपम्य सोहळाच ठरला.
या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तसेच उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यांच्यासह सेलिब्रिटींनाही हजेरी लावली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, डीएमके पक्षाचे नेते एम. के. स्टॅलिन, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, संजय राऊत,मनसे अध्यक्ष राज ठाकरे,खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण,देवेंद्र फडणवीस,मनोहर जोशी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रा.जोगेंद्र कवाडे,प्रतीभा पाटील, चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यामातोश्री,उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,आदित्य ठाकरे गणमान्य नेते तसेच हजारो शिवसैनिक उपस्थित होते.




