गोंदिया(खेमेंद्र कटरे)दि.28- आज मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा शिवतीर्थावर पार पडला.सोबतच उद्धव ठाकरे हे आमदार नसताना मुख्यमंत्रिपदी विराजमान होणारे राज्याचे 8 वे मुख्यमंत्री ठरले आहेत.यापूर्वी काँग्रेस नेते ए. आर. अंतुले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव निलंगेकर-पाटील, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमदार नसताना मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यावर ए. आर. अंतुले आणि शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवून विक्रमी विजय मिळवला होता, तर इतर चार नेतेही विधान परिषदेवर निवडून गेले होते.आत्ता ठाकरे हे विधानसभेच्या कुठल्या जागेवरून जातात की विधानपरिषदेतून जातात याकडे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरेंच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती मुख्यमंत्रिपदी विराजमान झाली आहे. संविधानातील तरतुदीनुसार कोणतीही व्यक्ती विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य नसेल, तर त्याला शपथविधी पार पडल्यानंतर पुढील सहा महिन्यांच्या आत विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्य व्हावे लागते.काँग्रेस नेते ए. आर. अंतुले यांनी 1980 मध्ये राज्यातील पहिले मुख्यमंत्री होते, जे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. त्यानंतर 1983 मध्ये लोकसभेचा राजीनामा देऊन वंसतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर 1985 मध्ये शिवाजीराव निलंगेकर-पाटील राज्याचे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.परत 1986 मध्ये केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिम्हा राव सरकारमध्ये विद्यमान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे संरक्षणमंत्री होते. पण, 1993 मध्ये झालेल्या दंगलीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते आणि त्यांच्या जागी शरद पवारांची वर्णी लागली होती. तसेच, 2010 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.तेव्हा त्यांच्या जागी मनमोहन सिंह सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाणांची वर्णी लागली होती. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यावर ए. आर. अंतुले आणि शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवून विक्रमी विजय मिळवला होता, तर इतर चार नेतेही विधान परिषदेवर निवडून गेले होते.





