मुंबई,दि.30- महाराष्ट्राचे नवनिर्नाचीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी आज पार पडली. विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या बाजूने 169 मत पडली, तर 4 जण तटस्ट होते. यावेळी भाजपने नियमबाह्य अधिवेशन बोलवल्याचा आरोप करत, सभात्याग केला.काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हा विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील या तिन्ही नेत्यांनी अनुमोदन केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ज्यांचा मंत्रिमंडळावर यांनी ज्यांचा पाठिंबा आहे. त्यांनी एका बाजूला बसण्याचे आदेश दिले.विधानसभेत अधिवेशनाला आणि बहुमत चाचणीला उपस्थित राहण्यासाठी सर्व पक्षांनीआपाल्या आमदारांना व्हीप जारी केला होता. विधानसभेचे कामकाज दुपारी 2 वाजता सुरू झाले. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सरकारच्या कामकाजावर बोट ठेवले. यावेळी त्यांनी अधिवेशन नियमबाह्य असल्याचे सांगितले.
विधानसभेत येण्याचा उद्धव यांचा पहिलाच दिवस असल्यानं भाजपा त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेणार असल्याची सगळ्यांनाच कल्पना होती. पण उद्धव ठाकरे कुठेही तोल ढळू न देता विधानसभेत थेट विरोधी बाकांवर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांजवळ गेले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांना मिठी मारली. तसेच त्यांच्या खांद्यावरही हात ठेवला, त्यामुळे विधानसभेत उपस्थित असलेल्या आमदारांचा भुवया उंचावल्या, सगळ्याच स्तरातून उद्धव ठाकरेंच्या या कृतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राहुल गांधी स्टाईल सभागृहात गाजली होती आणि त्याची जोरदार चर्चाही झाली. लोकसभेतही एकदा अनपेक्षितपणे राहुल गांधींनी भाषणानंतर मोदींच्या आसनाजवळ जात त्यांची गळाभेट घेतली होती. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला होता. ती गळाभेट चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या गळाभेटीची चर्चा होत आहे.
दरम्यान, सभागृहात झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. ठरावाच्या विरोधात मतदानासाठी सभागृहात एकही सदस्य उपस्थित नव्हते. विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अबू आझमी, हितेंद्र ठाकूर, बच्चू कडू यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मंत्रिमंडळावर सदस्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे त्याबद्दल मी आभार मानतो. तमाम जनतेचे आभार मानून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले या समाजसुधारकांना आणि आई-वडिलांना स्मरण करीत महाराष्ट्र घडविण्याचे शपथ घेतली आहे. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
“हे अधिवेशन नियमबाह्य असून, 27 नोव्हेंबरला राष्ट्रगीत झाले म्हणजे अधिवेशन संस्थगित झाले. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज असते, असे झाले नाही.” असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. तसेच नव्या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम ने व्हायला हवी होती. असेही ते म्हणाले. याववर उत्तर देताना विधानसभा हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यपालांच्या समन्सनेच हे अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर आहे, तुमचा मुद्दा मी फेटाळून लावतो. तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, सात दिवसाच्या आत सभागृह बोलवता येते. शपथविधी झाल्यानंतर बैठक झाली त्यानंतर काल राज्यपालांनी परवानगी दिली. त्यामुळे हे अधिवेशन कायदेशीर आहे. तुमचा मुद्दा फेटाळून लावतो. अशा पध्दतीने दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले.
दुसरीकडे, अध्यक्षपादासाठी काँग्रेसकडून नाना पटोले आणि भाजपकडून किसन कठोरे आहेत. यासाठी रविवारी म्हणजेच उद्या मतदान होणार आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी बहुमत सिद्ध करण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला होता. पण, आजच महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केले.





