23.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ वाशिम येथे चाचा नेहरु बाल महोत्सव उत्साहात संपन्न

वाशिम येथे चाचा नेहरु बाल महोत्सव उत्साहात संपन्न

0
51

महिला व बाल विकास विभागाचा पुढाकार

वाशिम, दि. 30 : जिल्हयात बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल असलेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुले आणि इतर बालके यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकाविषयी बंधुभाव, सांघीक भावना निर्माण होण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे 27 व 28 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बाल दिनाचे औचित्य साधून चाचा नेहरु बाल महोत्सव उत्साहात संपन्न झाला. तसेच बाल हक्क रक्षण व बालविवाह प्रतिबंध या विशेष मोहिमेचा तिसरा व शेवटच्या टप्प्याचा समारोप देखील चाचा नेहरु बाल महोत्सवात करण्यात आला.

बाल हक्क रक्षण व बालविवाह प्रतिबंधाचे महत्व याबाबत मोहिमेचा तिसरा आणि अंतिम टप्पा बालदिनाचे औचित्य साधून 14 नोव्हेंबरपासून सुरु होवून 28 नोव्हेंबरला समारोप करण्यात आला. चाचा नेहरु बाल महोत्सव कार्यक्रमाचे उदघाटन दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये चारवेळा उल्लेखनीय बाबीची नोंद करणाऱ्या चार वर्षीय विवान पराग सरनाईक या बालकाच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सैय्यद, समाजकल्याण, सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ. जयश्री गुट्टे, बाल कल्याण समिती सदस्य प्रा. अशोक ताजने, प्रकाश जोशी, अविनाश मुधोळकर, प्रा. डॉ. सुनिता राठोड उपस्थित होत्या.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी प्रास्ताविकातून बाल महोत्सव आणि बाल हक्क रक्षण व बालविवाह प्रतिबंध मोहिम या विषयी मार्गदर्शन केले. तसेच विवान पराग सरनाईक या बालकाने विविध कौशल्याची ओळख करुन दिली आणि उपस्थित सर्व मान्यवरांना बालदिनाच्या शुभेच्छा देऊन मुलांचे कौतुक केले. यामध्ये जिल्हाभरातील बालगृहे, निरीक्षणगृह, अनाथ, निराधार, उन्मार्गी मुले आणि इतर बालके यांच्यासह 600 पेक्षा विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून कब्बडी, खो-खो, रस्सीखेच, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन स्पर्धेत सहभाग घेतला.

या कार्यक्रमाप्रसंगी समारोपाला जिल्हा सत्र न्यायाधिश अशोक बिलोलीकर, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्याहस्ते स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या मुलांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.