जिल्ह्यात सोमवारपासून मिशन इंद्रधनुष्य लसीकरण
गोंदिया, दि:30 : गरोदर माता व बालकांमधील आजारपण आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आणि प्रभावी माध्यम आहे. जिल्ह्यात अभियान राबविण्यासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य 2.0 मोहिमेअंतर्गत 2 डिसेंबर 2019 पासून मार्च 2020 पर्यंत चार टप्प्यामध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये जी बालके पूर्ण लसीकरणापासून वंचित राहिलेली आहेत किंवा अर्धवट लसीकरण झालेले आहेत अशा बालकांचा आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत शोध घेवून अतिरिक्त सत्र लावून या बालकांचे व गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये आपल्या बालकांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले. सभेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रुखमोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रामटेके, माताबालसंगोपण अधिकारी डॉ.नितीन कापसे, एस.एम.ओ. डॉ.साजिद, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ.पराडकर व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यात 88 जोखीमग्रस्त भाग आढळलेली आहेत. यासाठी अतिरिक्त लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 24 गरोदर माता व 308 बालकांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली. नियमीत लसीकरण सत्रामध्ये आपल्या बालकांचे संपूर्ण लसीकरण वेळीच करुन घेण्याचे आवाहन पालकांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.




