गोंदिया; दि. 30: केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत नोकर भरतीच्या अनुषंगाने जाहिराती प्रकाशित करण्यात येतात. गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल भागात मोडत असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध विभागाच्या नोकर भरतीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने परीक्षेची तयारी कशी करावी, त्याकरीता आवश्यक बाबी इत्यादी विषयी तज्ज्ञ वक्त्यांमार्फत मार्गदर्शन करणे व विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रम ‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचा’ ही स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला सुरु करण्यात आलेली आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत प्रत्येक महिन्यात दर शुक्रवारला तज्ज्ञ वक्ते/अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येते. त्यानुसार सदर व्याख्यानमालेच्या बाराव्या सत्राचे आयोजन 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी स्मिता पाटील, कृषि अधीक्षक कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी (सांख्यिकी) विठ्ठल कवाठे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती.
स्मिता पाटील म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या तसेच राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यापूर्वी विद्यार्थी जी परीक्षा देणार आहे त्या परीक्षेचे अभ्यासक्रमाबाबत अगोदर सविस्तर माहिती घेवून विषयानुसार अभ्यासाचे नियोजन करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आयोगांच्या परीक्षाबाबत मनात कोणताही न्युनगंड न आणता तसेच नकारात्मक विचारसरणीला थारा न देता कष्ठ करण्याची तयारी ठेवून या परीक्षात यश मिळवावे. परीक्षेची तयारी करतांना विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता तयारीमध्ये सातत्य तसेच संयम ठेवावे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले.
विठ्ठल कवाठे म्हणाले, स्पर्धा परीक्षांची तयारी करतांना प्रयत्नांमध्ये सातत्य व जिद्द असल्यास यश मिळविणे कठीण नाही असे सांगितले. गोंदिया सारख्या ग्रामीण भागात तसेच पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत भागात विद्यार्थ्यांच्या तयारीमधील फरक स्पष्ट करतांना सराव चाचण्यांवर अधिकाधिक भर देण्याबाबत विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच परीक्षांची तयारी करतांना स्वयंप्रेरणा व उर्जा यांची सांगड घालून यश मिळविणे कठीण नसल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी ‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचा’ या व्याख्यानमालेअंतर्गत सन 2019-20 मधील शासनाच्या विविध विभागात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून सन 2018-19 व 2019-20 या दोन वर्षामध्ये 43 विद्यार्थ्यांची निवड शासनाच्या विविध विभागामध्ये झालेली आहे. सन 2019-20 या वर्षामध्ये नोव्हेंबर अखेर 21 विद्यार्थ्यांची निवड शासनाच्या विविध विभागात झालेली आहे.
व्याख्यानमालेचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखडे यांनी केले. उपस्थितांचे आभार वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अंकेश केदार यांनी मानले. व्याख्यानमालेत जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेचा पुढील सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
अहमदनगर येथे सैन्य भरती
गोंदिया : मेकॉनाईज अन्फेंट्री रेजिमेंट सेंटर,अहमदनगर येथे युनिट हेडक्वार्टर कोटाच्या अंतर्गत युध्य विधवा, विधवा, माजी सैनिक, सेवारत सैनिक यांच्या मुलांसाठी तसेच सेवारत सैनिक व माजी सैनिक यांच्या सख्खे भावांसाठी 9 ते 21 डिसेंबर 2019 पर्यंत सैन्य भरतीचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर आणि ट्रेडसमेन (10 वी पास) (म्युझिसियन) या पदासाठी भरती होणार आहे. कार्यक्रमानुसार महाराष्ट्राच्या उमेदवारांसाठी 9 डिसेंबर 2019 हा दिवस ठरविण्यात आलेला आहे. तरी गोंदिया जिल्ह्यातील युध्द विधवा, विधवा, माजी सैनिक, सेवारत सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गोंदिया यांनी केले आहे.
00000




