चेन्नई (वृत्तसंस्था) – तामिळनाडूचे कंप्युटर प्रोग्रावर आणि मेकॅनिकल इंजिनिअर शणमुग सुब्रह्मण्यम यांनी चंद्रावर विक्रम लँडरचे अवशेष शोधून काढले आहेत. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने यास अधिकृत दुजोरा दिला. भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेत लँडर राहिलेल्या विक्रमचा 87 दिवसांपूर्वी इस्रोशी संपर्क तुटला होता. तेच शोधून काढण्यात नासा आणि संबंधित युवकाने संयुक्त कामगिरी केली आहे. नासाने आपले ऑर्बिटर एलआरओमधून घेतलेली काही स्पष्ट छायाचित्रे प्रसारित केली आहेत. यामध्ये विक्रम धडकल्याचे ठिकाण आणि सभोवताल विखुरलेले तुकडे दिसून येत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, शणमुग सुब्रह्मण्यमने 3 ऑक्टोबर रोजीच एक ट्विट करून हा दावा केला होता. त्यास आता नासाने अधिकृत दुजोरा देत शणमुगला धन्यवाद म्हटले आहे.
लॅपटॉप आणि इंटरनेटच्या मदतीने असा घेतला शोध
इस्रोने चांद्रयान-2 मोहिमेत सोडलेले लँडर चंद्रावर व्यवस्थित लँड होऊ शकले नाही आणि 6 सप्टेंबर 2019 रोजी या लँडरशी संपर्क तुटला. शणमुग यांनी केवळ लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शनच्याम माध्यमातून ही कामगिरी केली आहे. चेन्नई येथील एका अपार्टमेंटमध्ये बसून त्यांनी रोज जवळपास 7-8 तास काम केले. याच दरम्यान, चंद्राच्या 2 चौरस किमी क्षेत्रावर शणमुग यांनी लक्ष केंद्रित केले. 3 ऑक्टोबर रोजी शणमुग यांनी एक ट्विट केले होते. त्यामध्ये हेच का ते विक्रम लँडर अशी विचारणा केली होती. यात त्यांनी नासा आणि इस्रोला देखील टॅग केले होते. 17 नोव्हेंबर रोजी शणमुग यांनी आणखी तपशील माहितीसह दोन छायाचित्रे देखील ट्विट केले.
नासासह इस्रोच्या संशोधकांना देखील दिली होती माहिती
एका खासगी माध्यमाशी संवाद साधताना शणमुग म्हणाले, मी केवळ नासाच नव्हे, तर इस्रोच्या संशोधकांना देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. नासा आणि इस्रोच्या संशोधकांना ट्विट करून टॅग करण्यासह ई-मेल सुद्धा पाठवले. परंतु, नासाने लवकर प्रतिसाद दिला. चंद्रावर निश्चित केलेल्या त्याच ठिकाणी नासाने आपल्या लुनार रिनेसा ऑर्बिटरने (एलआरओ) आणखी स्पष्ट सॅटेलाइट चित्रे काढली आणि हे अवशेष विक्रम लँडरचेच असल्याचे जाहीर केले.




